आजपासन पुणे विद्यापीठाचीच “फेरपरीक्षा’

तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेपासून वंचित 26 हजार विद्यार्थी देणार पेपर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा गेल्या महिन्यात घेण्यात आल्या होत्या. यात तांत्रिक अडचणी आल्याने व काही कारणास्तव परीक्षा न दिलेल्या 26 हजार विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा गुरुवार (दि.5) पासून सुरु होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून यासाठी यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.

 

अंतिम वर्षातील नियमित, अनुशेषित व रिपीटर्स विद्यार्थी, बहिस्थ अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 12 ऑक्टोंबरपासून ऑनलाइन व ऑफलाइनद्वारे घेण्यात आल्या होत्या. यात लॉगिन न होणे, इंग्रजी किंवा मराठी माध्यमांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, सर्व्हरमधील अडचणी, आकृत्या व सूत्रे न दिसणे, टेस्ट सबमिट न होणे, चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळणे, समकक्ष विषयामुळे अथवा इतर कारणांमुळे विद्यापीठाच्या दोन विषयांच्या परीक्षा एकाच वेळी असणे, सीईटी किंवा इतर शासकीय स्पर्धा परीक्षांचे आयोजन विद्यापीठ परीक्षांच्या दिवशी असणे, करोनाची बाधा झाल्याने अनुपस्थित असणे आदी विविध तांत्रिक व इतर कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्मद्वारे तक्रारीही नोंदवून घेण्यात आल्या होत्या, त्यांची पडताळणीही करण्यात आली आहे.

 

फेरपरीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे, त्यानुसार शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, मानसनिती व समाजविज्ञान, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची 5 नोव्हेंबरला, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी अभ्यासक्रमाची 6 नोव्हेंबरला, कला व विज्ञान अभ्यासक्रमाची 7 नोव्हेंबरला फेरपरीक्षा होणार आहे. सकाळी 10 ते सांयकाळी 6 यावेळेतच या परीक्षा होणार आहेत. मोबाइल, लॅपटॉप, कॉम्पुटर, टॅब सारखे ऑनलाइन साहित्य उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात किंवा जवळच्या महाविद्यालयात जाऊन त्या ठिकाणच्या संगणक कक्षातील सुविधा वापरुन परीक्षा द्यावी, अशा सूचनाही विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

 

अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षा विनाअडथळा व सुरळीतपणे होतील यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एजन्सीमार्फतच या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून पूर्वी झालेल्या त्रूटी आता राहणार नाहीत याची खबरदारी बाळगण्यात येणार आहे.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.