मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील या हाय प्रोफाइल ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी अंमली पदार्थविरोधी पथक अर्थात एनसीबीने मोर्चा सांभाळला आहे. एनसीबीच्या हाती अनेक महत्वाचे दुवे आले आहे. यातच एनसीबीने आता मुंबईतील डोंगरी परिसरात छापेमारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरी परिसरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रगचा संपूर्ण कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. या छापेमारीत एनसीबीला मोठे यश आले असून कोट्यवधी रुपयांची रोखरक्कम जप्त करण्यात आली आहे.
यावेळी अंमली पदार्थविरोधी पथक अधिकाऱ्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आणि हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे. अंमली विरोधी पथकाची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. या धडक कारवाईमुळे मुंबई अंमली पदार्थ तस्कारांना मोठा हादरा बसला आहे.