प्रतीक्षा वाढली; तीन हजारांपेक्षा अधिक संशयितांचे करोना अहवाल प्रलंबित

पिंपरी – शहरात महापालिकेच्या वतीने शहरामध्ये करोनाच्या घेण्यात येणाऱ्या चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या कमी दिसत आहे, परंतु प्रलंबित अहवालांची संख्या मात्र वाढत असल्याने चिंता व्यक्‍त केली जात आहे. तीन हजारांपेक्षा अधिक अहवाल प्रलंबित राहत असल्याने या प्रक्रियेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून करोना चाचणीचे घेण्यात येणारे अहवाल प्रलंबित राहण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 17 जानेवारीला 2432 तर, 18 जानेवारीला 2646 चाचणी अहवाल प्रलंबित होते. 19जानेवारीला 3019 तर, 20 जानेवारीला 3248 इतक्‍या संशयितांचे अहवाल प्रलंबित होते.

गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांपेक्षा अधिक चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या आटोक्‍यात आले आहे. शहरातील करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे प्रमाण गेल्या तीन दिवसांपासून दीडशेच्या आत आहे.

दोन दिवसांपेक्षा अधिक प्रतीक्षा?
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून बुधवारी (दि.20) प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसार गेल्या 24 तासांमध्ये 1357 संशयित चाचणीसाठी दाखल झाले होते. तर 1015 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आणि 118 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी स्थिती असतानाही प्रलंबित अहवाल 3248 इतकी होती. याचा अर्थ की प्रतिक्षेचा कालावधी दोन दिवसांपेक्षा अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात करोना चाचणीसाठी येणारे “स्वॅब’ तपासून त्यानुसार त्याचे अहवाल देण्याची व्यवस्था केलेली आहे. रुग्णालयामध्ये सध्या 500 ते 600 करोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. अतिरिक्त काम करायचे ठरविल्यास जास्तीत जास्त 700 ते 800 चाचण्या होऊ शकतात.

महापालिकेकडून सुरूवातीला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), “नारी’ संस्था आणि बी. जे. मेडिकल कॉलेज आदी ठिकाणी करोनाविषयक चाचण्यांसाठी “स्वॅब’ पाठविण्यात येत होते. मात्र, महापालिकेने चव्हाण रुग्णालयात प्रयोगशाळा विकसित करून तिथेच या चाचण्या घेण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सध्या वायसीएम रुग्णालयात या चाचण्या घेतल्या जात आहेत. प्रलंबित राहणाऱ्या करोना चाचण्यांचे प्रमाण पाहता महापालिकेला आता पुन्हा एनआयव्ही, नारी आणि अन्य संस्थांची चाचण्यांसाठी मदत घ्यावी लागणार आहे.

प्रशासकीय कारणामुळे सध्या करोनाच्या चाचण्यांना विलंब होत आहे. या विलंबाची कारणे शोधून संबंधितांना त्याबाबत विचारणा करण्यात येईल. 24 तासामध्ये चाचण्यांचे अहवाल देण्याबाबत सूचना करण्यात येतील.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी.


करोना संशयित रुग्णांचे “स्वॅब’ तपासून त्यावर चाचणी करण्याची व्यवस्था महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात केलेली आहे. त्यामुळे तिथेच याबाबतच्या चाचण्या सध्या केल्या जात आहेत.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी


महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये सध्या दररोज 500 ते 600 चाचण्या घेण्याची व्यवस्था केलेली आहे. अतिरिक्त काम करायचे ठरविल्यास दररोज 700 ते 800 चाचण्या होऊ शकतात. सध्या तपासणीसाठी येणाऱ्या “स्वॅब’ची तपासणी करून 24 तासात अहवाल देण्याची कार्यवाही केली जात आहे. सध्या केवळ 99 जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.