मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन नाकारला आहे. नवाब मलिकांनी वैद्यकीय कारणास्तव जामीनासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. मात्र, गुणवत्तेच्या आधारावर दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जवर दोन आठवड्यांनी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.
नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी मलिकांनी न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जाला ईडीने जोरदार विरोध केला. गेले वर्षभर मलिक हे त्यांच्या आवडीच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारांत तपासयंत्रणेने कोणतीही आडकाठी केलेली नाही.
तसेच एका किडनीवरही आयुष्य जगता येते. सध्या देशभरांतील कारागृहात मलिकांपेक्षा आजारी आणि वयस्कर कैदी आहेत. यामुळे हा त्यांच्यावर अन्याय होईल, असा युक्तिवाद एएसजी अनिल सिंह यांनी केला.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 45 नुसार 16 वर्षांपेक्षा कमी वयाचा आरोपी, महिला आरोपी किंवा आजारी आरोपींना जामिनाची तरतूद असल्याकडेही देसाई यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. मात्र न्यायालयाने ईडीचा युक्तिवाद मान्य करत नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली.