वॉशिंग्टन :- अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी आज सिनेटमधील एका मतदानाच्यावेळी “निर्णायक’ मत नोंदवले आणि भारतीय वंशाच्या कल्पना कोटगल यांना समान रोजगार संधी आयोगाच्या सदस्या म्हणून नियुक्त करण्यास अनुमोदन दिले.
अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी प्रथमच एका कृष्णवर्णिय महिलेच्या रुपाने कमला हॅरिस यांची 2020 मध्ये नियुक्ती झाली. 1825 ते 1832 या काळात उपाध्यक्ष असलेल्या जॉन कॉलहॉन यांच्या कामगिरीशी त्यांनी बरोबरी केली.
“इक्वल एम्प्लॉयमेंट ऑपोर्च्युनिटी कमिशन’ द्वारे रोजगारामध्ये वंश, लिंग, वर्ण, धर्म, मूळ राष्ट्रीयत्व, वय अपंगत्व किंवा अनुवंशिक माहितीच्या आधारे भेद बेकायदेशीर ठरवण्याच्या केंद्रीय कायद्याची सर्व राज्यांमध्ये सक्तीने अंमलबजावणी केली जाते.
कोटगल यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर सिनेटमध्ये 50-50 मते पडली होती. त्यामुळे निर्णायक मत देण्याची जबाबदारी कमला हॅरिस यांच्यावर येऊन पडली होती. सध्या सिनेटमध्ये डेमोक्रॅटकडे 51 आणि रिपब्लिकन पक्षाकडे 49 सदस्य आहेत.
सिनेटमध्ये उपाध्यक्षांना अध्यक्षांचे अधिकार असतात. या अधिकारांचा वापर समसमान मते पडल्यावर करता येऊ शकतो. त्याच अधिकारांचा वापर कमला हॅरिस यांनी आज केला.