नवी दिल्ली – आसियान देशांसाठी भारताने दिनांक 20 जुलै रोजी नवी दिल्लीत पारंपारिक औषधांवरील परिषद आयोजित केली आहे. भारत आणि आसियान देशांमधील व्यासपीठ बळकट करण्याच्या दृष्टीने पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात या देशांमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि भविष्यातील सहकार्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करणे हे या पारंपरिक औषधांवरील परिषदेचे उद्दिष्ट आहे.
भारत आणि आसियान मधील बहुआयामी संबंध हे समान भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांच्या मजबूत पायावर उभे असून हे संबंध दोन हजार वर्षांहून अधिक जुने आहेत. मधुमेह, कर्करोग, मानसिक आरोग्य यांसारख्या विविध असंसर्गजन्य रोग तसेच कोविड सारख्या संसर्गजन्य रोगांच्या उपचार आणि प्रतिबंधाच्या दृष्टीने,
आयुष प्रणालीवर उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी सद्यस्थितीत आयुष मंत्रालय ब्रिटन, अमेरिका , जपान, ब्राझील, जर्मनी या देशांमधील अनेक उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,
जैवतंत्रज्ञान विभाग, आयआयटी इत्यादी राष्ट्रीय संस्थांशी संलग्न आहे. आसियान परिषद आयुष मंत्रालयाने राबवलेल्या विविध प्रकल्पांचे संशोधन फलित सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. त्याचप्रमाणे आसियान देशही त्यांचे अनुभव सांगतील.