पुणे (प्रतिनिधी) – उद्यापासून(7 आॅक्टोबर) सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त शहरातील देवींची मंदिरे आणि उत्सवाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर पोलीस, राज्य राखील पोलीस बल (एसआरपीएफ) यांच्यासह होमगार्ड तैनात करण्यात येणार असून उत्सवाच्या ठिकाणी गर्दी होऊ न देण्याच्या सूचना स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवानंतर पोलिसांकडून नवरात्रोत्साच्या बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरातील मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे नवरात्रोत्सवामध्ये मंदिरांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर स्थानिक पोलिस ठाण्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
शहरातील तांबडी जोगेश्वरी, चतुःश्रुंगी माता मंदिर, भवानीमाता मंदिर, सारसबाग येथील लक्ष्मी माता मंदिर, तळजाई माता मंदिर, संतोषी माता मंदिरासह प्रमुख मंदिरांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली.