मोरगाव (प्रतिनिधी) : बारामती तालुक्यातील मोरगांव येथे अष्टविनायकाचा पहिला गणपती आहे. यामुळे येथे जगभरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. यामध्ये पुण्यातील भक्तांची संख्या नगण्य असून मोरगाव येथून नोकरी , व्यवसाय, शिक्षणासाठी पुणे, जेजुरी, सासवड येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे . यामुळे पुणे महानगर परीवहन मंडळाने उद्या (दि .७ रोजी) घटस्थापनेच्या मुहर्तावर पीएमटी बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत परीपत्रक काढले आहे .
मोरगाव हे अष्टविनायकापैकी प्रथम व महत्वाचे स्थान असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे गणेश भक्त दर्शनासाठी येतात .तसेच व्यवसाय , नोकरी निमित्ताने जेजुरी ,सासवड ,पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या व येणाऱ्या भक्तांची संख्या गृहीत धरुन जेजुरी प्रमाणे मोरगाव येथून पीएमटी बस सेवेची आवश्यकता असल्याबाबत पत्रव्यव्हार मोरगांवचे सरपंच निलेश केदारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीकडे केला होता .
तसेच मोरगांव येथे येणाऱ्या भक्तांच्या अधीक सुविधेसाठी पुणे महानगर परिवहन मंडळाकडे पीएमटी सेवा सुरु करण्याची मागणी चिंचवड देवस्थान ट्रस्टने पत्रव्यव्हाराद्वारे केली होती अशी माहिती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली. उद्या घटस्थापनेच्या मुहर्तावर प्रायोगिक तत्त्वावर दिवसभरात पाच पीएमटी बस (मोरगाव-हडपसर) धावणार असुन याबाबतचे अधिकृत वेळापत्रक पुणे महानगर परिवहन मंडळाने काढले आहे .