अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरवले आहे. तसेच नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नवनीत राणा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नवनीत राणा म्हणाल्या की, मी लढण्यावर विश्वास ठेवते, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सर्वोच्च न्यायालयात जाऊन यावर स्टे आणू असं नवनीत राणा यांनी म्हटलं. तसेच अमरावतीच्या जनतेने विरोधकांना पराभूत केलं आहे. एक्साईट होवून ते कोर्टात गेले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं.
यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेनेशी लढा सुरूच राहिलं असा इशाराही दिला. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला.