मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान शिवसेनेला दिले आहे. तर राणा मुंबईत आल्यास त्यांना प्रखर विरोध करणार असे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. 23 एप्रिल रोजी नवनीत राणा मुंबईत येणार आहेत तर दुसरीकडे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विरोधासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान हिंम्मत असेल तर बान्द्रा येथे येऊन दाखवा. शिवसैनिक सज्ज आहे. अशा आशयाचे पोस्टर मुंबईत झळकले आहे.
शिवसैनिकांनी नवनीत राणा यांना आव्हान देणारे बॅनर्स लावले असल्यामुळे मुंबतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नवनीत राणा उद्या मातोश्रीपर्यंत पोहोचल्या तर मोठा राजकीय हायव्होल्टेज ड्रामा होऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मातोश्रीबाहेरील बंदोबस्त वाढवला आहे. मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेनेची फिल्डिंग लावण्यात आली होती. राणा मुंबईत आल्यास त्यांना प्रखर विरोध करणार असे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तुम्ही येवून दाखवाच, असा थेट इशारा दिला होता. तसेच आम्ही नवनीत राणा आणि रवी राणांना कुठल्याही परिस्थितीत मुंबईला जाऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा अमरावती शिवसेनेकडूनही देण्यात आला आहे. शुक्रवारी विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना होतील, अशी एक शक्यता आहे. त्यांना रोखण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून शिवसैनिक मोठ्या संख्येने बडनेरा रेल्वे स्टेशनवर हजर राहणार आहेत.
दरम्यान, नवनीत राणा मुंबईत येऊन सेनेला दिलेले आव्हान पुर्ण करू शकणार का? अथवा त्या मुंबईत आल्यास शिवसैनिक त्यांना रोखू शकणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा उद्या मातोश्रीवर असणार आहेत.