मंचर पोलिसांनी दोन आरोपींना अवघ्या सहा तासात पकडले
मंचर – मंचर-गांजाळेमळा (ता. आंबेगाव) येथे घराच्या मालकीच्या जागेवरून दोन आरोपींनी संगनमत करून नवनाथ गांजाळे (वय 42) यांची हत्या केली. मंचर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी खुनाला वाचा फोडून सचिन गांजाळे आणि विनोद तांबडे या दोन आरोपींना अवघ्या सहा तासांत अटक केली.
नवनाथ गांजाळे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा भाऊ अंकुश गांजाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली होती. गांजाळे यांचा मृतदेह विहिरीत सापडला. रविवारी (दि. 16) रात्री गांजाळेमळा रस्त्यावर सरकारी विहिरीजवळून नवनाथ गांजाळे घरी येताना सचिन गांजाळे (रा. गांजाळेमळा) यांच्यामध्ये घराच्या जागेच्या कारणावरून वाद सुरू होता.
याचा राग मनात धरून सचिन आणि त्याचा मित्र विनोद तांबडे यांनी गांजाळे याची हत्या करून त्यांना विहिरीत टाकले, अशी माहिती नवनाथ गांजाळे यांचा भाऊ अंकुश गांजाळे यांना मिळाली होती.
अंकुश गांजाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात सचिन गांजाळे आणि विनोद तांबडे यांच्याविरोधात नवनाथ गांजाळे यांचा खून केल्याची तक्रार दिली. संबधित आरोपींनी खून केल्याची कबुली दिली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड करीत आहे.