नवी दिल्ली – नॅशनल मेडीकल कमिशन (एनएमसी) अर्थात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने आपल्या लोगोमध्ये अधिकृतपणे बदल केला आहे. मात्र या बदलामुळे आता वादही निर्माण झाला आहे. एनएमसीच्या नव्या लोगोत आता इंडिया शब्दाऐवजी भारत हा शब्द टाकण्यात आला आहे. तसेच लोगोमध्ये आयुर्वेदाचे देवता धन्वंतरी यांचाही फोटो घेण्यात आला आहे.
एनएमसीने आपली भूमिका मांडताना म्हटले की, जुन्या लोगोमध्ये धन्वंतरींचे ब्लॅक ॲंड व्हाइट स्केच होते. तो आता रंगीत करण्यात आला आहे. एनएमसीचे कार्यवाह अध्यक्ष बी. एन. गंगाधर म्हणाले की, यात सनसनाटी निर्माण केली जाण्यासारखे काहीही नाही. त्याचे कारण लोगोमध्ये काही विशेष बदल करण्यात आलेला नाही.
धन्वंतरींच प्रतिमा अगोदरपासूनच होती. आता सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. ब्लॅक ॲंड व्हाइट प्रतिमा प्रिंट केली जात नाही त्यामुळे ती रंगित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. जेंव्हा एनएमसीची स्थापना झाली होती तेंव्हाही धन्वंतरी यांची प्रतिमा घेण्याचा निर्णय घेतला गेला होता. जगातल्या अनेक देशांत अपोलोला उपचारांची देवता मानले जाते. तर भारतात धन्वंतरींना आरोग्य देवता मानले जाते.
दरम्यान, लोगोमध्ये इंडिया ऐवजी भारत असे नामकरण केले गेल्याचे त्यांनी मान्य केले. या आठवड्याच्या सुरूवातीला आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत हेल्थ आणि वलनेस सेंटरचे नाव बदलून आयुष्मान आरोग्य मंदिर केले जाण्याची घोषणा केली आहे. त्याला आरोग्यम परमं धनम् ही टॅगलाइनही जोडण्यात आली आहे.