पुणे – हॉकी इंडियाच्या 11व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हॉकी पंजाबने विजेतेपद मिळविले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशाचा शूट आऊटमध्ये 2-1 असा पराभव केला.
नियोजित वेळेत दोन्ही संघ गोलशून्यची बरोबरी तोडू शकले नाहीत. त्यानंतर घेण्यात आलेल्या शूट आऊटमध्ये पंजाबने बाजी मारली. पंजाबकडून विशाल यादव, मेहकीत सिंग, तर उत्तर प्रदेशकडून केवळ महंमद अमीर खान यालाच गोल करण्यात यश आले.
पंजाबकडून रणजोत सिंग, सिंग हरताज औजला यांना गोलरक्षकाला चकवण्यात अपयश आले. उत्तर प्रदेशाकडून अजय यादव, महंमद सादिक, महंमद सैफ खान आणि तरुण अधिकारी हे खेळाडू संधी साधू शकले नाहीत. त्यापूर्वी, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कर्नाटकाने यजमान महाराष्ट्राचा 5-2 असा पराभव केला.
कर्नाटकाने सामन्याला आक्रमक सुरवात केली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला यतिश कुमार याने गोल करताना महाराष्ट्राचा गोलरक्षक आकाश चिकटेला चकवले. त्यानंतर दोन मिनिटांनी अशीच कामगिरी करत कर्णधार महंमद राहिलने गोल करून कर्नाटकाची आघाडी भक्कम केली. महाराष्ट्राचा कर्णधार तालेब शाह याने 24व्या मिनिटाला गोल करून महाराष्ट्राचे आव्हान कायम राखले होते.