अहमदाबाद – अनेक ठिकाणी सध्या ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघतं. अगदी सख्ख्या भावांमध्ये वितुष्ट निर्माण होतं. अशीच काहीशी घटना गुजरातमध्ये घडली आहे. येथील एका उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ एक म्हणजे स्वत:च एक मत पडलं. वास्तविक पाहता त्याच्या घरातच १२ मतदार होते.
गुजरातमधील ग्रामपंचायत निवडणुकीचा मंगळवारी निकाल जाहीर कऱण्यात आला. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बॅलेट पेपरने निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत सरपंचपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारासोबत घडलेली घटना सध्या चर्चाचा विषय ठरली आहे.
संतोषभाई हलपती, असं या उमेदवाराचं नाव असून या उमेदवाराला अवघं एक मत पडल्याने सगळीकडं त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे.
संतोषभाई यांच्या घरात १२ जण मतदार असताना त्याला अवघं एक मत पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्यांनी देखील पाठ फिरवल्याने संतोष हे अत्यंत भावुक झाले आहेत. निकाल ऐकल्यानंतर ते निकाल केंद्रावर ढसाढसा रडाले. घरातील मंडळींनी साथ न दिल्याने संतोषभाई खचून गेले होते.