वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथांचा पायी पालखी सोहळा दर तीन वर्षांनी अधिक मास महिन्यांमध्ये वाई येथील कृष्णा नदीवर पवित्र स्नानासाठी जात असतो. या अधिक मासाच्या महिन्यामध्ये पूर्व परंपरा चालत आलेला पालखी सोहळा मंगळवारी (दि. 15) सकाळी श्री संत सावता महाराज मंदिरातून नाथाची काठी घेऊन, बाजारपेठेतून, ढोल, ताशा, सनई सवाद्यसह गुलालाची मुक्त उधळण करीत, ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करीत, ग्रामदैवत मंदिरात दुपारी एक समाज आरती घेऊन, या सोहळ्याने, गावच्या वेशीवरून, वाईच्या दिशेने आगेकूच केली. यावेळी, मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते.
हा पायी पालखी सोहळ्यात जवळपास नऊ बैलगाडीतून वीर, वाठार कॉलनी, भादे, शिवाजीनगर मार्गे खंडाळा येथे मुक्कामी करून, बुधवारी (दि.16) पहाटे दोन वाजता वाईकडे मार्गस्थ होताना, पहाटे खंडाळा घाटातून, हा पायी सोहळा सकाळी वाई च्या वेशीवर पोहोचला. यावेळी “नाथ साहेबाचं चांगभलं’चा जयघोष करीत, वाल्हे येथील ग्रामदैवतांच्या पालखीचा स्नानचा सोहळा वाई येथील गणेश मंदिराजवळील घाटाकडे, वाई बाजारपेठेतून, ढोल, ताई, सनई सवाद्यसह गुलालाची मुक्त उधळण करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना गणेश मंदिर घाटावर पोहोचला.
यावेळी ग्रामस्थांनी ग्रामदैवतांच्या मुखवट्याच्या मुर्तींना, पवित्र कृष्णा माईच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. यावेळी, ग्रामदैवत श्री भैरवनाथ, काळभैरवनाथ, भवानी माता, मसनेर, खंडोबा, नायकोबा अशा ग्रामदैवतांच्या पालख्या सह मानाच्या कावडी परंपरेनुसार कृष्णा माईच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. यानंतर आरती करण्यात आली. यानंतर ग्रामदैवतेला ग्रामस्थांनी धोंडे पोळ्याचा नैवेद्य अर्पण केला असल्याचे पुजारी सचिन आगलावे यांनी सांगितले. यावेळी, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घरच्या देवाऱ्यांतील देवांना नदीच्या पात्रात स्नान घालून, घाटावर पूजन केले. पालखी सोहळा बुधवार (दि. 16) संध्याकाळी छबीना कार्यक्रम पार पडून, मुक्कामी करून गुरूवारी (दि.17) सकाळी परतीच्या प्रवासाठी निघणार आहे.