नाशिक- आजच राज्य सरकारने एसटी विलीनीकरणाचा अहवाल मंजूर केला आहे. एसटी महामंडळ विलीनीकरण शक्य नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. थोडक्यात एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नसल्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. असे असताना नाशिक मध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
शिवनाथ फापाडे असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते फापाडे शहापूर आगारात एसटी ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा एसटीचे विलीनीकरण व्हावे यासाठी संप सुरु आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटातून जात जात आहे. त्यातूनच फापाडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पत्नी आणि तीन मुलांचा सांभाळ कसा करावा या विवंचनेत आत्महत्या केली असल्याचे फापाडे यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने विलीनीकरण शक्य नसल्याचे मंत्रिमडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी पुर्ण झाली नसल्याचे आता तरी चित्र स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मात्र विलीनीकरणासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली असल्याचे दिसून येत आहे.