खळबळजनक ! ‘पोलीसांच्या त्रासाला कंटाळून फाशी घेतोय…’; व्हिडीओ तयार करत तरूणाची आत्महत्या

नाशिक – पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका तरूणाने आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. योगेश हिवाळे (गंजमाळ परिसर, भिमवाडी, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. योगेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याने व्हिडीओ तयार करत आत्महत्या केल्याच्या घटनेने नाशकात एकच खळबळ उडालीय.

‘मी योगेश हिवाळे फाशी घेतोय, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वराडे साहेबांनी मला खूप त्रास दिलाय. तुझे आता थोडे दिवस बाकी आहे, मला धमक्या देतो मागे माझ्या घरात तलवार ठेवली होती त्याने. फाशी घेण्यास त्याने मला मजबूर केलंय. माझ्या आईवडिलांना, बावांना त्रास नको व्हायला एवढीच माझी ईच्छा आहे. मला फक्त वराडे यांनीच त्रास दिला आहे बाकी कोणीच नाही’, असं योगेशने आत्महत्येआधी तयार केल्या व्हिडीओत म्हटले आहे.

भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी वराडे यांनी वारंवार योगेशला त्रास देत धमकावल्याचा आरोप योगेशच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत शेकडो स्थानिक नागरिकांनी भीमवाडीत सकाळी ठिय्या आंदोलन केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रकरण संशयास्पद वाटल्याने हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. व्हिडीओ आणि कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबानुसार सखोल चौकशी केली जाणार असून यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई नक्कीच केली जाईल, असे आश्वासन पोलिस उपायुक्तांनी दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.