नवी दिल्ली – अनेकदा आपल्याला चौकातल्या रिक्षा थांब्यांवर चालक रिक्षातच दुपारची डुलकी घेताना दिसतात. तर काही रिक्षाचालक दिवसभर कष्ट करून थकल्यावर रिक्षालाच घर समजून तेथेच झोपी जातात. मात्र कोण्या रिक्षाचालकाने आपल्या तीन चाकी रिक्षालाच आलिशान घर बनवल्याचं तुमच्या ऐकिवात नसेलच.
तर ही कहाणी आहे अरुण प्रभू नावाच्या एका व्यक्तीची ज्याने रिक्षालाच आपलं आलिशान घर बनवलंय. प्रभू यांनी आपल्या रिक्षावर उभारलेलं हे घर इतकं टुमदार आहे की आता त्याची भुरळ खुद्द महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांना पडलीये. रिक्षावर उभारलेल्या या सर्वसुविधांयुक्त घराचे महिंद्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून भरभरून कौतुक केले आहे.
केवळ कौतुकच नव्हे तर आनंद महिंद्रा यांनी रिक्षावर घर उभारणाऱ्या प्रभूला एक खास ऑफर देखील देऊ केलीये. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात, ‘प्रभूने रिक्षावर घर उभारत कमीत कमी जागेचा उत्तम उपयोग कसा करता येतो हे दाखवून दिलंय. करोना विषाणूनंतच्या जगात भटकंती करण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे खूपच ट्रेंडी ठरू शकतं.’
‘जर अरुण प्रभू यांनी अशाप्रकारे बोलेरो पिकअप गाडीवर घर बनवलं तर मला आनंद होईल. कोणीतरी त्यांचा माझ्याशी संपर्क करून द्या’ असं आवाहनही महिंद्रा यांनी नेटकऱ्यांना केलंय.
Apparently Arun did this to demonstrate the power of small spaces. But he was also on to a larger trend: a potential post-pandemic wanderlust & desire to be ‘always mobile.’ I’d like to ask if he’ll design an even more ambitious space atop a Bolero pickup. Can someone connect us? https://t.co/5459FtzVrZ
— anand mahindra (@anandmahindra) February 27, 2021
कोण आहेत अरुण प्रभू?
अरुण प्रभू हे चेन्नईस्थित वास्तुविशारद आहेत. त्यांनी आपल्याकडील रिक्षामध्ये बदल करत रिक्षाला टुमदार घर बनवलंय. विशेष म्हणजे या रिक्षावरील घरामध्ये सामान्य घरांमध्ये असणाऱ्या सर्व सुविधा देखील आहेत. हे घर बनवताना अरुण यांनी हवा येण्यासाठी मोकळी जागा, खिडक्या-दरवाजे व कपडे सुकवण्यासाठी जागा देखील देण्यात आलीये.