वाराणसी – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते तसेच काही राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजपाने आपल्या पहिल्याच उमेदवारी यादीतून नरेंद्र मोदी हे पुन्हा वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यामुळे नरेंद्र मोदी हे यावेळी देखील वाराणसीतूनच लोकसभा निवडणूक लढवणार असले तरी, काँग्रेस पक्षाने मात्र अद्यापही वाराणसीतून आपला उमेदवार कोण असेल हे स्पष्ट केलेले नाही. मध्यंतरी काँग्रेसच्या उत्तर प्रदेश मधील सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांना आपण वाराणसीतून निवणूक का लढवू नये? असे विचारले होते. तर २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांचा ३ लाख मतांनी पराभव झाला होता.