नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले प्रथमच नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. नागपुरातील घरी जाऊन नाना पटोलेंनी मातोश्रींचा आशिर्वाद घेतला. नागपुरात दाखल होताच नाना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली.
नागपुरात दाखल झाल्यानंतर नाना पटोलेंनी दीक्षाभूमीवर जाऊन वंदन केलं. जनतेला भाजप विरोधात उभं करण्याची प्रेरणा या दीक्षाभूमीतून घेऊन जात असल्याचं पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं. लोकशाहीत असा ड्रामा चालत नाही, अशा शब्दांत पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
नाना पटोले यांचं दिल्लीहून सकाळी 11 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळावरुन दीक्षाभूमी, टेकडी गणेश मंदिर आणि ताजबागला पटोलेंनी भेट दिली. विधानसभा अध्यक्ष कोण होणार? हे हायकमांड ठरवेल. आता काँग्रेसमध्ये गटबाजी दिसणार नाही, असा दावाही यावेळी पटोलेंनी केला.