थेऊर (प्रतिनिधी) – हवेली तालुक्यातील पूर्व भागातील वाघोली, थेऊर,उरुळी कांचन व कळस मंडलाधिकारी कार्यालयातील तब्बल पन्नास महसूली गावांतील कार्यक्षेत्रासाठी अपर तहसीलदार म्हणून विजयकुमार चोबे यांची नियुक्ती झाली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. ही नियुक्ती नियमित तहसिलदार पदावर कामकाज पहावयाचा कालावधी 28 आठवडे आहे. प्रस्तुतची नियुक्ती विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांचे कार्यालयाने केली आहे.
हवेली तालुक्याचे महसूली क्षेत्रफळ व कामाचा व्याप जास्त असल्याने नागरिकांची नेहमीच ओढाताण होत असते याकामी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी हवेलीचे महसूली विभाजन करावे ही मागणी सातत्याने लावून धरली होती व शासनस्तरावर त्याचा पाठपुरावाही सुरू ठेवला असून त्याचे सकारात्मक पाऊल पडताना दिसत असल्याने आमदारांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यानिमित्ताने हवेलीचे महसूली विभाजन करावे या नागरिकांच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
पुणे विभागातील परिविक्षाधीन तहसिलदार यांना स्वंतत्र निवासी नायब तहसिलदार या पदावर पदस्थापना देण्यात आली होती. प्रस्तुतचा परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदाचा 27 आठवड्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. त्यामुळे विजयकुमार चोबे परिविक्षाधीन तहसिलदार यांना पुर्व हवेलीतील चार मंडलाधिकारी कार्यालयाचे अपर तहसिलदार या पदावर पदस्थापना देण्यात आलेली आहे. हवेलीचे तहसिलदार सुनील कोळी यांचेकडे कोथरुड, खडकवासला,खेड शिवापूर,हडपसर मंडलाधिकारी कार्यालयातील कार्यक्षेत्रातील नियमित तहसिलदार म्हणून कार्यभार राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली.
हवेली तालुक्याचे क्षेत्रफळ, प्रलंबित महसूली प्रकरणे,तहसील कार्यालयातील अपुरी कर्मचा-यांची संख्या इत्यादी कारणांमुळे हवेलीतील नागरिकांना शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. प्रशासकीय कामकाजात हवेलीतील नागरिकांच्या अडचणी कायम वाढतच गेल्याने येथील नागरिकांनी पुर्व हवेलीचे महसूली विभाजन करून स्वंतत्र कार्यालयाची मागणी आमदार अशोक पवार यांचेकडे वारंवार केली होती.
हवेली तालुक्याचे क्षेत्रफळ राज्यातील काही जिल्ह्यांपेक्षाही जास्त असल्याने प्रशासनावर कामाचा ताण आहे.त्यातच हवेलीतील पुर्व भागातील वाघोली, उरुळी कांचन,लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या गावांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. या भागात प्रशासकीय कामे राबवणेसाठी व नागरिकांच्या प्रश्र्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वंतत्र गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी व कायमस्वरुपी तहसिलदार,नायब तहसिलदार ह्या अधिका-यांची गरज आहे. त्यामुळे हवेलीचे महसूली विभाजन करून पुर्व हवेलीचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने स्वतंत्र तहसील कार्यालय पुर्व भागातच असावे ही मागणी शासनस्तरावर व पालकमंत्री यांचेकडे केलेली आहे. स्वतंत्र कार्यालय झालेस संजय गांधी निराधार योजना,पुरवठा विभाग, महसूल विभाग इत्यादी विभागातील कर्मचा-यांची व अधिका-यांची नव्याने पदनियुक्ती होईल.
– अशोक पवार, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस
आमदार पवारांनीही शासनस्तरावर हा विषय उचलून धरला आहे. त्यातच थेऊर, उरुळी कांचन, वाघोली,कळस मंडलाधिकारी कार्यालयासाठी अपर तहसिलदार यांची नेमणूक झाल्याने पुर्व भागातील जनतेने समाधान व्यक्त केले असून अपर तहसिलदार यांचे कार्यालयही पुर्व भागात घेण्याची मागणी केली आहे. अपर तहसिलदार चोबे यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2021 ते 23 आॅगस्ट 2021 असा असणार आहे.