मार्केटयार्डात हापूसच्या 15 पेट्यांची आवक
पुणे – हापूस म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा हापूसची कोकणातून मार्केटयार्डातील फळ विभागात तुरळक आवक सुरू झाली आहे. मंगळवारी सुमारे 15 पेट्यांची आवक झाली.
रत्नागिरी येथून आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर आलेल्या पेटीची खरेदी श्री छतपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी केली. सहा डझनाच्या पेटीला 11 हजार 111 रुपये भाव मिळाला. त्यावेळी फळविभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, गटप्रमुख बाळासाहेब कोंडे उपस्थित होते.
अरविंद मोरे म्हणाले, दरवर्षी फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात हापूसची आवक वाढण्यास सुरुवात होते. 15 जूनपर्यंत हंगाम सुरू असतो. एप्रिल आणि मेमध्ये 10 हजार पेट्यांपर्यंत हापूसची आवक होते. प्रतवारीनुसार त्यास भाव मिळत असतो. मागीलवर्षी करोनामुळे अनेकांना आंब्याची चवच चाखता आली नाही.
यंदा कोकणातील झाडांना फळधारणा चांगली आहे. आतापर्यंत हवामानाचा कोणताच परिणाम झालेला नाही. त्यामुळे यंदा हापूसचा हंगाम चांगला असणार आहे. आंब्याची आवक जास्त प्रमाणात होईल.