Narendra Modi – कॉंग्रेस सरकारने राजस्थानमध्ये पाच वर्षांत विकासाचे एक पाऊलही टाकले नाही. इथे फक्त खुर्च्यांचा खेळ सुरू राहिला आणि कॉंग्रेसचे नेते राज्याची लूट करत राहिले. कॉंग्रेसचे भ्रष्टाचाराचे प्रत्येक काळे कृत्य “लाल डायरी’त लिहिलेले आहे, असे समजते.
त्या लाल डायरीची गुपिते उघड झाली पाहिजेत. पण कॉंग्रेस हे होऊ देणार नाही. त्यामुळे आता राज्यात भाजपचे सरकार आणा. कारण भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांनी कॉंग्रेसच्या अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकारवर टीका केली.
मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा बालेकिल्ला असलेल्या जोधपूरला भेट दिली. येथे त्यांनी काही नव्या प्रकल्पांची पायाभरणी केली आणि पाच हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी सर्वसाधारण सभेला संबोधित केले.
भाषणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पीएम मोदींनी सीएम गेहलोत यांच्यावर निशाणा साधला. काही काळापूर्वी झालेल्या शासकीय कार्यक्रमात अशोक गेहलोत उपस्थित नव्हते, असे ते म्हणाले.
हजारो कोटींच्या प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्याला ते आले नाहीत, कारण मोदी आले तर सर्व काही सुरळीत होईल, असा त्यांना विश्वास आहे. मी गेहलोतजींना सांगतो की तुम्ही विश्रांती घ्या, आम्ही सर्व काळजी घेऊ.
निवडणुकीच्या वेळी राजस्थानच्या तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन देणाऱ्या कॉंग्रेसने तरुणांचा विश्वासघात केला आहे. कॉंग्रेस सरकारने तरुणांना पेपर लीक माफियांच्या ताब्यात दिले आहे. या माफियांनी लाखो तरुणांचे भविष्य उद्वस्त केले आहे.
भाजपचे सरकार आल्यानंतर राज्यात पसरलेल्या अशा प्रत्येक माफियांवर कडक कारवाई केली जाईल. मोदी म्हणाले की, कॉंग्रेस सरकारने राजस्थानला गुन्हेगारीत नंबर वन केले आहे. जोधपूर, सांचोर, जालोर येथे मुलींवर गुन्हे घडले. त्यांचा काय दोष होता?
कॉंग्रेसच्या आमदारालाही इथे सुरक्षित वाटत नाही. भाजप आला तर महिलांसह सर्वांना सुरक्षा मिळेल. कॉंग्रेस आणि अहंकारी आघाडीचे नेते दररोज मुलींसाठी अपमानास्पद शब्द वापरत आहेत. केंद्र सरकारला राज्यातील प्रत्येक घरात नळाला पाणी पोहोचवायचे आहे.
पण, राज्यातील कॉंग्रेस सरकारला बहिणी-मुलींच्या प्रश्नांची काळजी नाही. हे सरकार नळपाणी योजनेत अडथळे निर्माण करण्याचे काम करते. येथे पाणी योजनांमध्येही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.