नगर – महाराष्ट्र राज्य सहकारी संघ संचलीत नगर येथील सहकारी संस्था, कार्यकर्ते, विद्यार्थी व सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत असलेले सहकार प्रशिक्षण केंद्रास सहकारातील गाढे अभ्यासक स्व.सहकार महर्षी गोपाळरावजी सोलेपाटील यांचे नांव देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक व नगर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष पांडूरंग सोलेपाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतून झाली असून महाराष्ट्र राज्य सहकारी संघ गेली अनेक वर्षांपासून राज्यात सहकारी चळवळीचे प्रशिक्षण, शिक्षण व प्रसाराचे मोठे कार्य करीत आहे. राज्यातील १३ प्रशिक्षण केंद्रामार्फत व डॉ. विठ्ठलराव विखेपाटील सहकार प्रबंधन संस्था पुणे व बॅ. डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंधन संस्था नागपूर याद्वारे सहकारी कार्यकर्ते विद्यार्थी, कर्मचारी यांना सहकाराचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे.
स्व.गोपाळराव सोलेपाटील हे राज्य सहकारी संघाचे ७ वर्ष अध्यक्ष म्हणून, ३ वर्ष उपाध्यक्ष म्हणून व २ वर्ष मानदसचिव म्हणून तसेच ४० ते ४५ वर्ष संचालक म्हणून राज्य सहकारी संघात त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे. सोलेपाटील हे राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली, नॅशनल अग्रिकल्चर को. ऑपरेटिव्ह फेडरेशन (नाफेड) नवी दिल्ली या दोन्ही संस्थाचे त्यांनी दोन वर्ष उपाध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले आहे. सहकारी संस्थांतील ग्रामीण भागापासून ते राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून जवळपास २४ सहकारी संस्थांवर त्यांनी कामकाज पाहिले आहे. जिरायत भागातील एवढे मोठे नेतृत्व होणे ही एक जामखेड तालुक्यासाठी भूषणावह बाब आहे.
सहकार महर्षी गोपाळरावजी सोलेपाटील यांनी सहकार चळवळीत दिलेले योगदान तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थावर अध्यक्ष व संचालक म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्याच बरोबर गाव, तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून ३५ ते ४० वर्ष विविध संस्थांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानदसचिव, संचालक या पदावर भरीव कामकाज केलेले आहे. म्हणून संघाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती चिरंतर रहाव्यात असा संघाचा विचार असल्याने सहकार प्रशिक्षण केंद्र नगर यांस सहकार महर्षी गोपाळरावजी सोलेपाटील यांचे नांव देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळ सभा व वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा राज्य शासनाचे सहकारी संस्थाचे सहनिबंधक सोनाली रावल- ठाकूर यांनी दिली.
पुणे येथील राष्ट्रीय सहकारी संघाचे डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखेपाटिल को. ऑपरेटिव्ह ट्रेनिंग कॉलेजला डॉ. विखेपाटिल यांचे नांव देण्यास स्वर्गीय गोपाळरावजी सोलेपाटील यांनी विशेष प्रयत्न करुन कॉलेजाना सहकारातील भिष्म असणा-या विखेपाटलांचे नांव देण्याचा सोलेपाटील यांनी आग्रह धरुन पुणे येथील को- ऑपरेटिव्ह ट्रेनिंग कॉलेजला डॉ. विखेपाटिल यांचे नांव दिले. त्याच पद्धतीने स्वर्गीय गोपाळरावजी सोलेपाटील यांचे सहकारातील योगदानाचा विचार करुन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास शंकर मोरे, उपाध्यक्ष हिरामण साहेबराव सातकर, मानदसचिव विदयाताई शशिकांत पाटिल, संचालक अर्जुनराव मल्हारी बोरुडे यांच्या विशेष प्रयत्नातून सहकार प्रशिक्षण केंद्र अहमदनगर यांस सहकार महर्षी गोपाळरावजी सोलेपाटील यांचे नांव देण्यात येणार आहे.