विधानसभेची निवडणूक लढवणारच : नामदेव राऊत

कर्जत  – मागील पंचवीस वर्षांपासून पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. दोन विधानसभा निवडणुकांत उमेदवारीचा प्रयत्न करूनही मिळाली नाही. यावेळीही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली. आठ दिवस सर्व पर्याय खुले आहेत. आता किंगमेकर नाही तर आमदारकी लढणारच आहे. कार्यकर्ते म्हटले तर अपक्षही निवडणूक लढवू. आठ दिवसांत महामेळावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असा अल्टीमेट भाजपचे नेते व उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंच आयोजित संकल्प मेळाव्यात दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी संकल्प मेळावा घेतला.

अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे होते. राऊत म्हणाले, 2009 व 20014 मध्ये आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली. पण मला डावलले गेले. आताही भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाने आठ दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा सर्व पर्याय खुले आहेत. आता माघार नाही. विधानसभा निवडणूक लढविणार आहे. पुढे दोन बलाढ्य उमेदवार आहेत, यांचा मी विचार करत नाही. कारण मतदारसंघातील सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे.

यावेळी महासंग्राम युवा मंचचे अध्यक्ष भारत मासाळ, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नागेश गवळी, सावता हजारे, समीर जगताप, सरपंच किरण पावणे, काकासाहेब धांडे, भाऊसाहेब जंजीरे, मनीषा सोनमाळी, शिवकुमार सायकर, प्रदीप टापरे, संपत बावडकर, पप्पू नेवसे, सारंग घोडेस्वार यांची भाषणे झाली. या मेळाव्यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद दळवी माजी सभापती सुवर्णा राऊत, मंगेश जगताप, म्हाळगीचे सरपंच महेश जगताप, संतोष नलवडे, तात्या माने, मनोज भोरे, महेश निमोनकर, अनिल गदादे, अमृत काळदाते कर्जत नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. मेळाव्यासाठी कर्जत व जामखेड तालुक्‍यांतील सर्व पक्षीय कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. राऊत यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने पालकमंत्री राम शिंदे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रॅलीतून केले शक्तिप्रदर्शन

मेळावा सुरू होण्यापूर्वी कर्जतच्या अक्काबाई नगर येथून भव्य रॅली काढण्यात आली. यात कर्जत शहरासह मिरजगाव, राशीन, कुळधरण, माहीजळगाव, जामखेडमधील मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. यातून नामदेव राऊत यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यातून पालकमंत्री राम शिंदे तसेच पक्षाला अप्रत्यक्षपणे त्यांनी इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.