पाथर्डीचा अभ्यास करूनच निर्णय घेणार : ना. पंकजा मुंडे

बाबासाहेब गर्जे

पाथर्डी  – तुम्ही मांडलेली भूमिका चूक की बरोबर याबाबत मी आताच काही अंदाज बांधू शकत नाही. तुमच्या मागणीला हो किंवा नाही असे काहीच उत्तर देवू शकत नाही, मतदारसंघातील आणखी लोकांची मते जाणून घेऊ द्या, निर्माण झालेल्या परिस्थितीचा मला अभ्यास करू द्या, मी जीवनात दिलेला शब्द पाळला आहे. तुम्हाला अंतर देणार नाही व त्रास होईल, असा कुठलाही निर्णय घेणार नाही अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पाथर्डी व शेवगाव मतदारसंघातून ऍड. प्रताप ढाकणे यांना विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या समर्थकांना दिली.

शेवगाव पाथर्डी मतदार संघातील शेकडो समर्थकांनी परळी येथे जाऊन ना.मुंडे यांची भेट घेतली. भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्याविषयी तक्रारीचा पाढा वाचतानाच केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांना भाजपकडून उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला. यावेळी बोलताना भाजपचे उपाध्यक्ष राजेंद्र नागरे म्हणाले, या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते स्व. मुंडे साहेबांना व तुम्हाला प्रथम मानणारे आहेत.

प्रथम तुमचे नाव घेतो व नंतर प्रताप ढाकणे यांचा विचार करतो. मतदारसंघात सध्या आमदार राजळे हटाव मोहीम सुरू आहे. तिच मोहीम हाती घेऊन आम्ही येथे आलो आहोत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन राजळेंना हटवून ऍड. ढाकणे यांना उमेदवारी द्यावी. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मतदार संघातील सर्वच इच्छुक साहेबांनी आम्हालाच शब्द दिल्याचे सांगत होते. त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार ज्यांना (राजळे) तुम्ही उमेदवारी दिली त्यांचे व आमचे अनेक वर्षांचे वैर होते. मात्र मुंडे साहेबांचा व ताईंचा उमेदवार म्हणून आम्ही भरघोस मते दिली. निवडून आल्यानंतर मात्र राजळे यांनी आम्हाला सपत्नीक वागणूक दिली.

जुन्या भाजप कार्यकर्त्यावर प्रचंड अन्याय केला. याच ठिकाणी ढाकणे आमदार असते तर कार्यकर्त्यांवर अन्याय झाला नसता. भगवानगडाचा प्रश्‍न निर्माण झाला नसता. नुकत्याच तालुक्‍यात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर ताई तुमचा फोटो नव्हता. जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी जाब विचारल्यानंतर तुम्हाला दाखवण्यापुरते तुमच्या फोटोचे बॅनर छापण्यात आले. मुंडे शिवाय आम्ही गर्दी जमू शकतो. आम्ही काहीही करू शकतो असे लोकप्रतिनिधींचे समर्थक बोलतात. यापुढे आमच्यावर अन्याय करू नका, तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहोत. ढाकणेंना उमेदवारी द्या ते यापुुढे आपल्याला सोडून कुठेही जाणार नाहीत. नागरे यांच्या मागणीला कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करून प्रतिसाद दिला.

ना. मुंडे म्हणाल्या, तुमच्या भावना मला समजल्या आहेत मात्र जगात असे कुठेच झाले नसेल. एका पक्षाचा माणूस दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा हट्ट करतो आहे.तुम्ही ज्यांच्यासाठी उमेदवारी मागत आहात ते मुळात भाजप पक्षात नाहीत. यावेळी ना.मुंडे यांनी उपस्थितांमध्ये भाजपचे कार्यकर्ते किती आहेत? हात वरती करा असे विचारले.

यावेळी उपस्थित सर्वांनीच हात उंचावून आम्ही भाजपचे असल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीचे कोण आहेत त्यावर कुणीही हात उंचावला नाही. यावर ना.मुंडे म्हणाल्या, त्यांना राष्ट्रवादीत एकही कार्यकर्ता नाही का? तुम्ही सगळे मला भेटण्यासाठी येत आहात हे मला माहित नव्हते. एवढ्या मोठ्या संख्येने माणसे बसतील एवढे मोठे माझे घर नाही, मात्र मन मोठे आहे. तुम्ही आलात तुमची भावना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. कुठल्याही मतदारसंघात स्थानिक लोकप्रतिनिधी विषयी 25 टक्के लोकांची नाराजी असते. तुम्ही राष्ट्रवादीच्या माणसाला भाजपची उमेदवारी मागता. ते उमेदवारी मागत नाहीत आणि तुम्ही मागता. आतापर्यंत असे कधीचे झालेले नाही असे मुंडे म्हणताच.ढाकणे यांनी तेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हा त्यांनी मला कुठे तिकीट मागितले.

साहेब (स्व.मुंडे) असतांनाच ते (ऍड.ढाकणे) भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले होते. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मतदारसंघातील इतरांची मते जाणून घेऊ. मला तुमच्या मतदारसंघात डायरेक्‍ट आमदार होता येत नाही म्हणून कोणाला तरी करावे लागते. यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी तुम्ही या मतदार संघात उभे राहा असा आग्रह केला. त्यावेळी मुंडे म्हणाल्या, मी मैदान सोडून जाणार नाही. मतदारसंघातील लोकांची मत जाणून घेऊ अभ्यास करून निर्णय देऊ, ग्वाही दिली. यावेळी अनिल ढाकणे, बाजार समितीचे माजी सभापती गहीनाथ शिरसाट, राजेंद्र खेडकर, बाजार समितीच्या उपसभापती मंगल गर्जे, किरण खेडकर, शरद सोनवणे, जलील पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)