श्रीगोंदा – नागवडे साखर कारखान्यावर गुप्त खलबते झाल्याच्या बातम्या आज वृत्तपत्रात आल्यामुळे अनेक लोकांचा संभ्रम झालेला आहे. बबनराव पाचपुते सोडून मी विधानसभेसाठी इतर कोणाचीही शिफारस करणार नाही, कारण इतरांनी माझे लोकसभेचे काम तर केलेच नाही उलट विरोधी उमेदवाराचे काम केले असल्याचे खासदार सुजय विखे यांनी ठासून सांगीतले.
पारगाव (ता. श्रीगोंदा) येथे आयोजित कार्यक्रमात डॉ.विखे बोलत होते. खा. विखे पुढे म्हणाले. भाजपमध्ये येणारांना आमचा विरोध नाही, परंतु ज्या बबनराव पाचपुते यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक प्रचार करून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मला चांगले मताधिक्य मिळवून दिले. त्यांचीच शिफारस मी विधानसभेसाठी करणार आहे. विधानसभा झाल्यावर पाचपुते यांच्या सत्काराच्या निमित्ताने श्रीगोंदे तालुक्यातील प्रत्येक गावात मी येणार आहे.
कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत सर्व पाणीवाटप संस्थेच्या अध्यक्षांची बैठक घेऊन कोणत्या चारीला किती तारखेला आणि किती क्युसेक्सनी पाणी येणार याच्या नियोजनाची प्रत त्यांना व कार्यकर्त्यांना देऊ. कुकडीचे पाणी श्रीगोंदे तालुक्याला सोडण्याबाबत मी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उद्याच चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब महाडिक. संदीप नागवडे, सभापती शहाजी हिरवे, ऍड. सुभाष डांगे, दिनकर पंधरकर, रमेश गिरमकर, बाबासाहेब सरोदे, संपत दरेकर, भीमराव लांडगे, संतोष दरेकर उपस्थित होते.
शेलारांची जबाबदारी माझ्याकडे
खा. डॉ. सुजय विखे आपल्या म्हणाले, प्रा. तुकाराम दरेकर हे तुमच्या तालुक्यात अभ्यासू आहेत. मुख्यमंत्र्यांना सांगून प्रा. दरेकर यांना राज्यपातळीवर एखाद्या अभ्यास मंडळावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देईन. आण्णासाहेब शेलार हे पाचपुते यांचा केक गोड करून घेतील व शेलारांची जबाबदारी माझ्याकडे राहील, असे ही विखे म्हणाले.