बिबट्याला मारून नखांची तस्करी

महाबळेश्‍वर – विषारी औषधाचा वापर करुन बिबट्याची शिकार करुन तस्करीसाठी नखे काढणाऱ्या चार जणांना वनविभागाने जेरबंद केले आहे. संभाजी सदाशिव जंगम, बापु रखमाजी जंगम, पांडुरंग कृष्णा जंगम व शिवाजी धोंडीराम जंगम (रा. सर्व घोणसपूर, ता महाबळेश्‍वर) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहे. दरम्यान, चौघांकडून बिबट्याची अठरा नखे, एक कोयता व मृत बिबट्याचे अवशेष हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी चारही संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी, 13 जानेवारी रोजी बापु रखमाजी जंगम याच्या गायीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गायी ठार झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरून बापु जंगम याने घराजवळील जंगलात विषारी थायमेट हे औषध टाकले होते. त्या विषारी औषधामुळे बिबट्याचा मृत्यू झाला होता. 15 जानेवारी रोजी बापू जंगम व अन्य तीन साथीदार यांनी या मृत बिबट्याची सर्व नखे कोयत्याने तोडुन काढली. बापु याने 6 नखे स्वत: घेतली व इतर तिघांना प्रत्येकी तीन तीन नखे दिली. मृत बिबट्याचे उरलेले अवशेष त्या चौघांनी जवळच्या जंगलात पुरून ठेवले. याबाबत वन विभागाला माहिती मिळाली असता त्यांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली असत चौकशीत तथ्य आढळुन आल्याने वन विभागाने या चौघांनाही अटक केली.

याप्रकरणी चौघांवरही गुन्हा दाखल केला आहे. चौघांना न्यायालयात हजर केल असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सर्व कारवाई उपवनसंरक्षक भारतसिग हाडा, सहाय्यक उपवनसंरक्षक व्ही. बी. भडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, वनपाल एस. एम. शिंदे, एस. के. नाईक, वनरक्षक ज्योती घागरे, दीपक सोरट, आशिष पाटील, रोहित लोहार, सहदेव भिसे, लहु राऊत, विश्‍वभंर माळझरकर, मुकेश राउळकर, माधव ताटेवाड, आकाश कुंभार, विद्या घागरे, वनपाल एस. के. शिंदे आदींनी सहभाग घेतला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.