ऊन

उन्हाचे कवडसे सकाळच्या कोवळ्या प्राजक्ताचे केशर पांघरूण दरवळतात. रोज नव्या चैतन्याने आभाळाच्या अंगणात खेळणारे ऊन, झाडांच्या नाजूक अंगाखांद्यावर उतरते. फुलांवर सांडते. झाडेही मग उन्हाला पानांनी कवटाळतात, कुशीत घेतात.

एखाद्या घराच्या म्लान झालेल्या चिरेबंदी भिंतींना गुदगुल्या करत अंगणात उतरणारी उन्हाची बाळे
स्वतःला धुळीत माखून घेतात ना! तेव्हा त्यांच्या त्या धुळमाखल्या चेहऱ्यांवरचे खट्याळ हसू उतू जात राहते.
पानांआड लपून बसणाऱ्या कळ्या आणि तांबूस कोवळी पालवी हे ऊन्हाचे सांगाती. त्यांच्याशी दिवसभर लपाछपीचा खेळ रंगवताना उन्हे; अंगणातल्या खाटेवर, पिंपळाच्या पारावर, पार्कातल्या बेंचवर नाहीतर गॅलरीतल्या झुल्यावर विसावतात. जरा दमसास घेतात. मग रंगत जातात गप्पांचे फड. या पोपटी झालर लावलेल्या उन्हाच्या कोवळ्या सोनेरी गप्पांचे ओघही फार सुरेख असतात बरं..! जणू ती पानं, त्या कळ्या आपले उतरत्या रात्रीतले चंदेरी अनुभव उन्हाला सांगतात की काय असे वाटते. खिडकीजवळ रेंगाळणारी एखादी वेल वाऱ्याचा हात धरून गोफ खेळताना हळूच खिडकीत डोकावते अन्‌ तिलाही जे लाजेचे धुमारे फुटतात ते ऐकून ऊनही गोरेमोरे होते.

गप्पांचे सारीपाट असेच रंगताना, उन्हाचे काही पदर सांडतात डांबरी सडकेच्या कडेला किंवा धावतात बैलगाडीच्या चाकांसोबत. तेव्हा उन्हाळलेल्या ठशांचे कोरीवकाम उमटत जाते मग मातीवर. दिवस चढत जाताना स्वतःला न पडलेली स्वप्ने जोजवत, त्यांना स्वतःची उब देत जुन्या झालेल्या जीर्णशिर्ण क्षणांना आठवत उन्हे उदासतात…सावळी होतात. स्वप्ने काय किंवा ती कशी असतील याचा विचार करत धगधगतात. तेव्हा जुनी जाणती झाडे, पुराणे वाडे, जुन्या इमारती उन्हाचा रुक्षपणा आपल्या सावलीच्या हातांनी कवळतात… जणू त्यांना कळले असावे की स्वप्ने फक्त जीवनेच्छा वाढवतात. कोणे एके काळी स्वतःच्या नवेपणात पाहिलेली स्वप्ने रोज नव्या क्षणांसह वाढवताना पुढच्या भविष्यातील क्षणांसाठी सोडून दिली जातात… पण नव्याने उजाडणाऱ्या पहाटेसोबत उत्साहाने उतरणाऱ्या उन्हाला जसा अंत नसतो तसाच क्षणांच्या जन्मालाही. हेच जणू त्यांना उन्हाला सांगायचे असेल का?

डोळे किलकिले करून उन्हाला निरखणारी छपरे उतरणीच्या उन्हाला निरोप देताना मात्र म्लान होत जातात. एखादे श्‍वासगाणे संपलेले पान तुटलेल्या देठांतून विलग होत घरंगळते. पानाचे असे हे निर्वाण पाहताना ऊन अबोल निबोल होते… कसमसते…

ही एकूटवाणी हुरहूर उन्हाला सांध्यवेळ बनवते. झरझरणारे ऋतू जाणते होत जातात. उन्हातल्या पावसाला पापणीत साठवतात. अन्‌ परत कधी? चे रेशीमबोल उन्हाच्या मिठीत विरघळतात. तेव्हा वाटतं, हजारो मैल अंतर असूनही एकच गाणे लहरावे. अन्‌ मातीच्या मनाने शुष्क कोरडे भास जोजवत उन्हाला साद घालावी. एखादी दुरातून उजेड माखलेली मल्हारधून यावी उन्हाच्या ओंजळीत आणि तिने सुखाचे भिंगुळवाणे गाणे गावे, अगदी समरसून. जसा तप्त उन्हाळा मनावर आठवांचा हलकासा शिडकावा होतो ना तसेच व्हावे अन्‌ ऊन संध्येला भेटायला आतूर व्हावे. खुदको सिमटने की कोशिश है जारी, चलो देखते है… दामन क्‍या करता है? अशाच एका उतरणीच्या संध्याकाळी ऊन न्याहाळताना वाटतं, ऊन रुसलं की सावली हिरमुसते आणि लपून बसते गुलमोहराच्या लालस देठात..
.
ऊन मग कासाविस होतं आणि शोधू लागतं सावलीचे ओले पदर… गुलमोहराच्या पाकळ्या ओघळू लागतात हळूहळू… जणू शिडकावा व्हावा सावलीचा, उन्हाच्या तापल्या मनावर. तेव्हा दूर नदीकिनारी कुणी तापलेला बहर उदासलेल्या दुपारी बाजूला सारत शोधत राहतो, सांजगारवा… नदीच्या वाहत्या जिवात मिसळतो हरवलेला जोगिया. उन्हाची काहिली पाहून सावली थरथरते अन्‌ धावते उन्हाच्या बहराला कवेत घ्यायला. जणू मनात म्हणत असावी तेव्हा…
सोच रही हूं खत लिखने की, लेकिन क्‍या पैगाम लिखूं,
तुझ बिन कटी रात लिखूं, या साथ गुज़ारी शाम लिखूं…
हीच ती वेळ… जेव्हा उधाणलेल्या मनात क्षितिजरेघांची बिंब उमटतात. तरूंची काया मिसळू लागते एकमेकांत… उन्हाचा सावलीच्या देहातला परतीचा प्रवास सुरू होतो आणि विरघळतो सांजछायेत पुन्हा पुन्हा.
सावलीला उन्हाच्या श्‍वासांचे भास जाणवतात. ती तिथेच थबकते. अस्वस्थ अनावर चौकटीत बांधलेली राहते.
दूर जाणाऱ्या उन्हाकडे अनिमिष नेत्रांनी बघत. एकटक क्षितिजरेघेसारखी स्तब्ध… विरहिणी…

उन्हानं थकून सावलीतच बस्तान मांडलेलं असतं तेव्हा अन्‌ कवडशांच्या चिमण्या खापऱ्यांवर, तुळशीच्या अंगणात, पिंपळाच्या डेऱ्यात खेळू लागतात. अबोल पणत्या मनात तेवायला लागतात. पारावरचा पिंपळ अंग झटकतो त्यासरशी पानांची पिल्लं खाली मातीत हुदड्या मारायला लागतात. पानांचा तो दंगा बघताना, आपले मातीत पसरलेले पिसारे झटकत ऊन एक लांबलचक सांजेची जांभई देते आणि दिमाखात क्षितिजाची वाट चालू लागते… त्याला परतताना पाहून ढगांचे चुकार अबलख वारू त्याच्या लवाजम्यात सामील होतात. नदीच्या काहूरवेणा तिन्हीसांज प्रसवत राहतात. गाई-म्हशींची धुळ माखली पावले परतीच्या किनाऱ्याला लागलेली पाहून बगळ्यांची माळ, राव्यांचे थवे आणि मोरांच्या केकावल्या सुरू होतात आणि त्याचवेळी तो आसमंत उधळायला सुरुवात करतो. आपले टप्पोरं थेंब शिंपत सरसरून तो येतो आपल्या प्रेयसीच्या अलगद मिठीत. त्याचे अनपेक्षित येणे तिला मोहरून जाते. क्षणांत तो उन्हाच्या पिसाऱ्यातून चोरलेली इंद्रधनूची मेखला तिच्या आभाळात रेखतो. ती लाजते, मोहरते, दरवळते. सलज्ज सांजेच्या पापण्या झुकतात अन्‌ चांदण्या उमलतात… उन्हे मात्र न पाहिलेली स्वप्ने गोळा करत पानांवरून, खोडांवरून, छपरे आणि गॅलऱ्यांमधून काढता पाय घेतात… आठवणीत ठेवून जातात फक्त, वैशाखातल्या तप्त रात्री…

मानसी चिटणीस

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.