संगमनेर – संगमनेर कारखान्याचे संस्थापकच बदलले असा गंभीर दावा करीत आपले पाप लपविण्यासाठीच खासदारांच्या नावाचा वापर केला असून, नाचता येईना अंगण वाकडे असा जोरदार पलटवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. वडगाव पान येथील कार्यक्रमात विखेंचे नाव न घेता आ. बाळासाहेब थोरात यांनी टीका केली होती. त्यांच्या “त्या’ वक्तव्यावर संगमनेरात येऊन मंत्री विखे पाटील यांनी पलटवार केला आहे.
मंत्री विखे म्हणाले की, खासदारकीच्या माध्यमातून यांनीही 35-40 वर्ष काढली. त्यांना आम्ही मते दिली. कधी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांना साधा एक बसस्टॉप बांधता आला नाही. आज तेच आम्ही काय केले असा सवाल करीत असल्याची घणाघाती टीका करून त्यांनी थोरात यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत आपण पक्ष संघटनेला धरून किती काम केले असा सवाल करीत तुमचे मेव्हणे लोकसभेला उमेदवारी करीत असताना तुम्ही कोणाला मते दिली ते सर्व जनतेला माहीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मलाही त्यांच्या “पिताश्रीं’विषयी बोलता येईल, मात्र जी व्यक्ती हयात नाही त्याबाबत बोलणार नाही. संगमनेर साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील होते. मात्र, यांनी आता दुसरेच संस्थापक तयार केल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. आपण सुसंस्कृत संस्कृतीमध्ये वाढलो आहोत. संघर्ष आपला आहे. जुन्या लोकांना यात ओढून आपण काय साध्य करणार आहात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
जरांगे यांच्याकडून सुरू असलेल्या निःस्वार्थ आंदोलनाला आम्ही यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे आणि त्यांच्या पक्षातील अन्य नेत्यांच्या वक्तव्यातील विरोधाभासावर बोट ठेवत त्यांनी “राजकीय कट’ मारताना नाव न घेता विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार आरक्षण या विषयावर काहीच बोलत नाही. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्यावे की स्वतंत्रपणे याविषयी त्यांनी भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेदेखील अद्यापपर्यंत गप्प बसून आहेत. या सर्वांची आरक्षणाबाबत असलेली भूमिका यावरून दिसून येते. मात्र, सरकारने मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्याचे आपले धोरण यापूर्वीच जाहीर केले असून, ते दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
आमदार थोरात व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा फैरी , टीका-टिपण्णी सुरू आहेत. गणेश कारखाना निवडणूक, निळवंडे धरणाच्या श्रेयावरून एकमेकांवर टीका केली जात असून, दोघांतील वाकयुद्ध वाढतच चालले आहे.
आरक्षणाबाबत कॉंग्रेससह राष्ट्रवादी, उबाठाची चुप्पी!
मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही मराठ्यांना कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, कॉंग्रेससह राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेनेने (ठाकरे गट) अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.