पुणे – महापालिकेकडे नोंदणी असलेल्या तसेच महापालिकेच्या अनुदानातून सुरू करण्यात आलेल्या महिला बचतगटांच्या उत्पादनांना आता वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या शिवाय, पुणेकरांना या वस्तूंची खरेदी घरबसल्या करता येणार असून या उत्पादनांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून “अणु’ ई-मार्केट सुरू केले जाणार आहे.
यासाठीच्या संकेतस्थळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या शिवाय, संकेतस्थळानंतर लगेचच यासाठीचे मोबाइल ऍपही उपलब्ध करून दिला जाणार आहे. महापालिके सोबतच जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांची उत्पादनेही उपलब्ध असणार आहे. या मार्टमुळे बचतगटांना हक्काची बाजारपेठ तसेच ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक उत्पादनांची माहिती मिळणार आहे.
दरम्यान, महापालिकेचे शहरात नोंदणीकृत 5 हजार 400 बचतगट असून त्यातील व्यावसायिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या 1200 बचतगटांची या मार्टवर नोंदणी असणार आहे. तर महापालिकेसह जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या बचतगटांची उत्पादनेही असणार आहेत.
महिलांना उत्पन्नाचे हक्काचे साधन
महापालिकेकडून शहरात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचतगट चालविले जात असले तरी, दुसरीकडे या बचतगटांनी उत्पादीत केलेल्या साहित्याला कायमस्वरूपी बाजारपेठ मिळत नाही. बचतगट प्रदर्शने तसेच सणांच्या दिवसांमध्ये वैयक्तिक पातळीवर साहित्याची विक्री करतात. तर महापालिका दिवाळी तसेच उन्हाळ्यात बचत बाजार आयोजित करते. त्यामुळे वर्षभरातील काही ठराविक दिवसच गटांना उत्पादन विक्री करता येते. मात्र, या ई-मार्टमुळे बचतगटांना वर्षभर उत्पादन विक्री करता येईल. या उत्पादनासोबतच बचतगटाचे नाव, त्याची माहिती तसेच संपर्क क्रमांकही या ठिकाणी असणार आहेत.
असा होईल फायदा…
- बचतगटांची उत्पादने ऑनलाइन पाहता येतील
- बचत गटांना वर्षभर बाजारपेठ मिळेल
- उत्पादनांना ग्राहक स्वत:च रॅकिंग देतील
- अडीच हजार बचतगटांना मिळणार संधी
- घरबसल्या आवश्यक साहित्य खरेदी करता येणार