सोनई – नेवासा तालुक्यातील श्री शेत्र शनिशिंगणापूर देवस्थानचे चारशे कर्मचारी दि. 25 डिसेंबरपासून संपावर जात आहे. कर्मचारी संपावर गेल्यास नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तारांबळ होण्याची शक्यता आहे.
विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असल्याने कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
देवस्थान अद्यापही काही निर्णय घेत नसल्याने वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थानकडून निर्णय होणे अपेक्षित आहे कर्मचारी विविध 10 मागण्यांवर ठाम आहेत. मात्र देवस्थानकडून अद्यापही निर्णय होत नसल्याने कर्मचारी युनियनच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात शनी शिंगणापूर देवस्थान आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यानंतर कर्मचारी यांनी बैठक घेऊन संपावर जाण्याचा निर्णय घेतला. कामगार युनियनच्या वतीने देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात 25 मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यापैकी दहा मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत .
सर्व कामगारांचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा आणि पद निश्चिती करा, पाचव्या वेतन श्रेणीप्रमाणे 2003 ते 2023 पर्यंतचा फरक अदा करून मागील फरकासह सर्व कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा, कामगारांच्या वारसांना अनुकंपा सेवेत समाविष्ट करून घ्या, सर्व कामगारांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा मोफत करा, करोना महामारी मरण पावलेल्या कामगारांच्या वारसांना मदत द्या व एका व्यक्तीला देवस्थानच्या सेवेत समाविष्ट करून घ्या,
प्रॉव्हिडंट फंड कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, देवस्थानच्या कर्मचाऱ्याकडून गैरवर्तन घडल्यास किंवा तसे आढळून आल्यास सदर कर्मचाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची चौकशी समितीमार्फत चौकशी करावी, त्या चौकशी समितीमध्ये कामगार युनियनचे दोन संचालक प्रतिनिधी घ्या, कामगारांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी 58 वरून 60 वर्षे करा,
कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यंचा पगार बोनस किंवा सानुग्रह अनुदान म्हणून बोनस देण्यात यावा, देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा करोना काळातील राहिलेला अर्धा पगार अदा करण्यात यावा, अशा मागण्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या आहे. होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थान कर्मचारी यांच्याकडून संपाचे हत्यार उपसल्याने देवस्थानकडून यावर काही निर्णय घेतला जातो का, याकडे संपूर्ण भाविकांचे लक्ष लागले आहे.