पुणे – नाताळ सणानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. महात्मा गांधी रस्ता परिसरात होणारी गर्दी विचारात घेऊन सोमवारी (25 डिसेंबर) सायंकाळी सातनंतर आवश्यकता भासल्यास वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. नाताळ सणानिमित्त शहर, परिसरातून नागरिक महात्मा गांधी रस्ता परिसरात गर्दी करतात. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी म्हटले आहे.
सायंकाळी सातनंतर महात्मा गांधी रस्त्यावरील पंधरा ऑगस्ट चौकातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. तर, कुरेशी मशिद, सुजाता मस्तानी चौकातून वाहतूक वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकातून अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक तीन तोफा चौकातून वळविण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून मोहंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटमार्गेन स्व. इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. स्व. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या भागातील वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे वळविण्यात येणार आहे.