पुणे – पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या विकासासाठी केंद्र शासनाने “पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना सुरू केली आहे. याद्वारे त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 टक्के व्याजदरात विना तारण 3 लाख रुपयांपर्यंत दोन टप्प्यांत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात अठरा पारंपरिक बलुतेदार कारागिरांचा समावेश असेल.
कोठे करावी नोंदणी?
- ऑनलाइन पद्धतीने सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योग विभागाचे संकेतस्थळ, सामान्य सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करणे आवश्यक.
- आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा पुरावा किंवा हस्तांतरण प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बॅंकेचे पासबुक व आधारकार्ड संलग्न मोबाइल नंबर या कागदपत्रांची आवश्यकता आहे. - योजनेचा उद्देश
बलुतेदार कारागिरांच्या उद्योगास स्थैर्य निर्माण करणे, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत आर्थिक मदत, ब्रॅंड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी व्यासपीठ तयार करणे.
या मिळणार सुविधा
कारागिरांना 5 दिवसीय मुलभूत प्रशिक्षण व 15 दिवसीय कौशल्य पूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. या काळात दररोज 500 रुपये विद्यावेतन, प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र प्रदान केले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना टूलकिट खरेदीसाठी 15 हजार रुपयांचे व्हाऊचर्स देखील देण्यात येणार आहे.
“पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजनेसाठी नोंदणीस पुणे जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. पारंपरिक बलुतेदार कारागिरांनी आपल्या जवळच्या सामान्य सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन नोंदणी करावी. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.