श्रीगोंदा – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना श्रीगोंद्यातून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा असताना ते त्यांच्याच मांडवगण जिल्हा परिषद गटात तब्बल दोन हजार मतांनी मागे पडले. तसेच राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या कोळगाव गटात देखील भाजप उमेदवाराला जवळपास साडेचार हजार मतांची आघाडी मिळाली. तुलनेत कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांच्या बेलवंडी गटात भाजपला केवळ आठशे मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहता, आमदार जगताप द्वयींपेक्षा नागवडे उजवे ठरल्याचे चित्र आहे.
श्रीगोंदा हा राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा मूळ तालुका असल्याने येथून आ. जगताप यांना कमीत कमी 15 हजारांचे मताधिक्य मिळेल, असे आडाखे बांधले जात होते. मतमोजणीनंतर आकडेवारी समोर आल्यानंतर सगळे आडाखे चुकीचे ठरले आणि श्रीगोंदा तालुक्यातून डॉ. सुजय विखे यांना 18 हजार 595 मतांची आघाडी मिळाली, तर श्रीगोंदा मतदारसंघात असणाऱ्या नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांत डॉ. विखेंना तब्बल 11 हजार 997 इतके मताधिक्य मिळाले. श्रीगोंदा मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ. सुजय विखें यांना 30 हजार 592 मतांची आघाडी मिळाली. तालुक्यातील सहाही जिल्हा परिषद गटांत डॉ. विखेंना मताधिक्य मिळाले.
तालुक्यातील मांडवगण जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांना येथून विक्रमी मताधिक्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात आ. जगताप यांच्या ऐवजी डॉ. विखेंना मांडवगण गटातून तब्बल 1 हजार 946 मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या घोगरगाव या गावातून डॉ. विखेंना 107 मतांची आघाडी मिळाली. डॉ. विखेंना मांडवगण गटात मिळालेले मताधिक्य आ. जगताप द्वियींसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत श्रीगोंदा शहरात कॉंग्रेस आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर शहरावर वर्चस्व प्रस्थापित केल्याच्या अविर्भावात आघाडीचे नेते होते.
लोकसभा निवडणुकीत मात्र शहरातून भाजप उमेदवाराला 2 हजार 668 मतांची आघाडी मिळाली. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी गटातून अपेक्षेप्रमाणे डॉ. विखेंना 3 हजार 318 मतांची आघाडी देत गटावरील एकहाती वर्चस्व सिद्ध केले. आढळगाव गटातून डॉ. विखेंना 2 हजार 394 मतांची आघाडी मिळाली. मात्र विखे समर्थक असलेल्या ऍड. सुभाष डांगे यांच्या वडाळी आणि प्रा. तुकाराम दरेकर यांच्या हिरडगाव या गावांत डॉ. विखे पिछाडीवर राहिले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर आघाडीच्या उमेदवाराला हिरडगावमधून मताधिक्य देण्यात यशस्वी झाले. मात्र राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांच्या पेडगावात आघाडीचे आ. जगताप पीछाडीवर राहिले.
कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांच्या बेलवंडी जिल्हा परिषद गटात डॉ. विखेंना अवघी 813 मतांची आघाडी मिळाली. बेलवंडी गटातील अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा व अनिल वीर ही मंडळी डॉ. विखेसोंबत असताना बेलवंडी गटात डॉ. विखेंचे मताधिक्य घटविण्यात नागवडेंना यश आले.
आमदार राहुल जगताप यांचे “होमग्राऊंड’ समजल्या जाणाऱ्या कोळगाव गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य मिळण्याचे दावे केले जात असताना प्रत्यक्षात मात्र भाजपच्या डॉ. विखेंना येथून 4 हजार 362 मतांची विक्रमी आघाडी मिळाली. तालुक्यात कोळगाव गटाने डॉ. विखेंना सर्वाधिक मताधिक्य दिले. कोळगाव गटातून डॉ. विखेंना मिळालेली साडेचार हजार मतांची आघाडी आमदार राहुल जगताप यांच्या जिव्हारी लागणारी आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी आहे.