मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची आज दीड वर्षानंतर तुरुंगातून जामीनावर बाहेर आले असून जामीनासंबंधी मुंबई सत्र न्यायालयात जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. क्रिटी केअर रुग्णालयाबाहेर नवाब मलिकांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मान्य केली होती. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लॉंडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती.
प्रकृतीच्या कारणास्तव पुढील दोन महिन्यांसाठी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना जामीन मिळाला आहे. नवाब मलिक यांची तब्बल एक वर्ष पाच महिन्यांनी जेलमधून सुटका झाली आहे. नवाब मलिक मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी कुर्ला क्रिटी केअर रुग्णालयात दाखल होते.
मलिकांच्या सुटकेची बातमी कळताच त्यांचे कार्यकर्ते रुग्णालय परिसरात जमले होते. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेदेखील मलिकांच्या सुटका झाल्यानंतर रुग्णालयात भेटीसाठी पोहोचल्या होत्या. यावेळी मलिकांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा जल्लोष केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात अटी आणि शर्तींची पूर्तता करण्याबाबत सुनावणी झाली. मुंबई सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांचा जामीन, साक्षीदारांना धमकावू नये, घराचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्यावा, पासपोर्ट जमा करावा, मीडियाशी बोलू नये आणि गुन्हेगारी कृत्यात भाग घेऊ नये अशा अटीशर्थींवर मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला.