पुसेगाव, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंतर्गत झालेल्या तालुकास्तरीय तपासणी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था या विभागातून जिल्हा परिषद केंद्रशाळा राजापूर ही शाळा अव्वल ठरली आहे.
खटाव तालुक्यातून निवड झालेल्या 21 केंद्रातील प्रथम ठरलेल्या शाळांची तालुकास्तरीय समितीकडून नुकतीच तपासणी झाली. या तपासणीमध्ये सर्वात जास्त गुणांकन मिळवून या शाळेने आपले प्रथम स्थान निश्चित केले आहे.
या स्पर्धेसाठी तीन लाख रुपयांचे ठेवण्यात आलेले बक्षीसही शाळेने पटकवले. शाळेची सजावट, आदर्श वर्गरचना, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, विविध तालुकास्तरीय व जिल्हास्तरावरील स्पर्धेतील यशस्वी सहभाग, गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवलेले शाळेचे अभिनव उपक्रम, शाळा व्यवस्थापन समितीचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य, राष्ट्रीय एकात्मतेसाठी शाळेने राबवलेले प्रयोगशील प्रकल्प, स्वच्छता, आरोग्य,वृक्ष संवर्धन, भौतिक सुविधा अशा अनेक निकषांच्या अनुषंगाने शाळेची सखोल तपासणी करण्यात आली होती. राजापूर शाळेने यातील सर्व निकष प्रभावीपणे पूर्ण केल्याने शाळेने हे अलौकिक यश संपादन केले आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी मुख्याध्यापक नितीन खोत, विनोद गोडसे, अजित चव्हाण, सुवर्णा घनवट, वैशाखी साबळे , सपना राऊत, धनश्री तापोळे, अमृता शेवते या सर्वांनी खूप परिश्रम घेतले आहेत. राजापूर शाळेच्या लक्षणीय यशाबद्दल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रतिभा भराडे, शिक्षण विस्तार अधिकारी सोनाली विभुते, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख एस. के. जाधव, केंद्रप्रमुख, मोहनराव साळुंखे, प्रमोद जगदाळे यांनी अभिनंदन केले.