नगरपरिषद, जानकीदेवी बजाज व कारपे संस्थेच्या विद्यमाने शहरात अभियान
राजगुरूनगर -राजगुरूनगर नगरपरिषद व जानकीदेवी बजाज, कारपे संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात “माझं राजगुरूनगर, स्वच्छ राजगुरूनगर’ अभियान राबविण्यात आले. राजगुरूनगर नगर परिषदेच्या वतीने व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून राजगुरूनगर शहरात स्वच्छता अभियान प्रचार प्रसार कार्यक्रमाचे आयोजन आज राक्षेवाडी परिसरातील नगरपरिषद हद्दीत राबविण्यात आले.
त्याची सुरूवात नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या हस्ते झाली. यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, स्वच्छता समितीच्या सभापती संपदा सांडभोर, नगरसेवक बापू थिगळे, स्नेहल राक्षे, ग्रामपंचायत सदस्य मचिंछद्र राक्षे, कारपेचे समन्वयक सुरेश घोरपडे, किरण थिगळे, नगरपरिषद आरोग्य अधिकारी चारुबाला हरडे, शहर समन्वयक सतिश कांबळे, मुकादम कैलास सांडभोर, प्रवीण देशमुख, कॉन्ट्रॅक्टर देविदास सातकर, बाळासाहेब सातकर, नगरपरिषद कर्मचारी, कारपे प्रतिनिधी राहुल निकम, रेश्मा ढावरे, पुजा पिंगळे, सतीश मलघे, विशाल जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे अभियान स्वामी समर्थ नगर, थिगस्थळ, आशानंद रेसिडेन्सी, वाफगाव रोड राजगुरूनगर येथे राबविण्यात आले. यामध्ये कचरा वर्गीकरण जनजागृती अभियान सुरु करण्यात आले. श्री स्वामी समर्थ नगर व आशानंद रेसिडेन्सी, वाफगाव रोड येथील नागरिकांच्या हस्ते घंटागाडीची सुरु करण्यात आली. कारपे समन्वयक सुरेश घोरपडे यांनी उपस्थित नागरिकांना आपल्या शहरात चालू असलेल्या स्वच्छता अभियान विषयी माहिती दिली. तीन प्रकारे कचरा वर्गीकरण विषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.
प्लॅस्टिक वापराचे तोटे, ग्लोबल वार्मिंगची माहिती, ओझोन थर कमी झाल्याने पर्यावरणावर काय परिणाम होत आहे, याबाबत माहिती दिली. माझं राजगुरूनगर स्वच्छ राजगुरूनगर अभियानाला सहकार्य करावे आणि वर्गीकृत कचराच आपल्याकडे येणाऱ्या घंटागाडीमध्ये द्यावा, असे आवाहन केले. यावेळी माझं राजगुरूनगर स्वच्छ राजगुरूनगर अशी घोषणा देण्यात आल्या.
येथील श्री स्वामी समर्थ नगर थिगस्थळ, आशानंद रेसिडेन्सी, वाफगाव रोड मधील 200 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले यात महिलांची संख्या मोठी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य अधिकारी चारुबाला हरडे यांनी केले. शहर समन्वयक सतिश कांबळे यांनी आभार मानले.
आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सदैव तत्पर राहू तसेच आपण सर्वांनी माझं राजगुरूनगर स्वच्छ राजगुरूनगर या अभियानाला सहकार्य करावे. आपले शहर स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये अव्वलस्थानी आणणेकरिता सहभागी व्हावे.
-स्नेहल राक्षे, नगरसेविका