सभापती अंकुश राक्षे : खेडमधील शाळांसाठी 16 कोटींचा निधी उपलब्ध
राजगुरूनगर -जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांचे अधिकारी स्वतः पाहणी करून अगदी कमी खर्चात दर्जेदार कामी करीत आहेत; मात्र आपल्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे इस्टिमेट जास्त असूनही कमी पाहिजे त्या दर्जाची होत नाहीत.
अनेक विकास कामांवर त्यांचे बारकाईने लक्ष नसते. त्यांनी जानकीदेवी बजाज संस्थेच्या अधिकाऱ्यांप्रमाणे काम केले पाहिजे. तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती रखडणार नाही.
यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असून ग्रामस्थानी याबाबतीत पुढाकार घेतला पाहिजे. गावातील अंगणवाड्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी केले.
जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था व जिल्हा परिषद यांच्यात मागील वर्षी राजगुरुनगर येथे जिल्हा परिषद शाळा इमारती बांधणे व दुरुस्तीसाठी करार झाला होता. त्यानुसार संस्थेच्या माध्यमातून सामाजिक दायित्व निधीतून 80 जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत. यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. संस्थेच्या माध्यमातून 10 टक्के रक्कम गावाने देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
मात्र, ग्रामीण आदिवासी भागातील गावांना ही 10 टक्के रक्कम भरणे शक्य नसल्याने आदिवासी भागातील 33 शाळांचे बांधकाम रखडले होते. त्यावर पर्याय म्हणून खेड पंचायत समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून तरतूद करून 10 टक्के निधी (23 लाख 50 हजार रुपये) निधी मंजूर केला आहे.
त्याचे मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या खात्यात हा निधी वर्ग करण्यात आला. त्याबाबतच्या पत्राचे बुधवारी (दि. 22) वितरण करण्यात आले. यानिमित्ताने पंचायत समितीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सभापती राक्षे बोलत होते.
यावेळी उपसभापती ज्योती अरगडे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, सदस्या नंदा सुकाळे, मारुती सातकर, जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अधिकारी प्रमोद मेश्राम, गटविकास अधिकारी अजय जोशी, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विस्तारअधिकारी जीवन कोकणे, सरपंच दत्ता खाडे यांच्यासह 33 गावांतील सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक उपस्थित होते.