“तुरुंगात माझा जीव वाचवला”, म्हणत भुजबळांनी मानले भाजप खासदाराचे जाहीर आभार

मुंबई – राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी सभा घेण्यात येतातय. जळगाव येथे ओबीसी परिषद आयोजित करण्यात आली होता. या परिषदेत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी भाजपचे खासदार आणि केंद्रीयमंत्री कपील पाटील यांचे आभार मानले.

ओबीसी परिषदेत भुजबळांनी चौफेर टोलेबाजी केली. ‘इथे सगळे विविध विषयांवर जोरजोरात बोलले. चर्चा केली. पण सावध राहा बाबा. उद्या घरी आयकर विभागवाले आले नाही म्हणजे झालं. जो जो येईल, त्याला जस ऊस चरख्यात टाकून रस काढला जातो, तसं काढतात. आता सध्या खडसे साहेबांच्या पाठीमागे लागले आहेत,’ असंही भुजबळांनी म्हटलं.

दरम्यान भुजबळ यांनी तुरुंगात असतानाची आठवण सांगितली. ते म्हणाले की, मी तुरुंगात असताना एकदा माझी प्रकृती फार बिघडली होती. तुरुंगातील जीवन कठीण असतं. कुणाला तरी तुरुंगात टाकायचं. तो आजारी पडला की त्याच्याकडे बघायचं नाही आणि एक दिवस गेल्यावर म्हणायचं की हार्ट अटॅकने गेला. तिथंच विषय संपतो. पण कपिल पाटील यांना जेव्हा कळलं, तेव्हा त्यांनी विधानमंडळात उभा राहून भुजबळांची काळजी घेतली जात नसल्याचं म्हटलं. तसेच त्यांना तुरुंगातच मारून टाकणार का, असा सवाल केला होता.

यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्र पाठवून भुजबळांना काही झालं तर हे सरकार जबाबदार राहिल असं म्हटलं. त्यातून मी सुदैवाने बाहेर पडलो. कपिल पाटील यांच्यामुळे माझा जीव वाचल्याचं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं. तसेच त्यांचे आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.