पिंपरी (प्रतिनिधी) – कविता भोंगाळे युवा मंच व सागर गवळी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे, प्रभू श्रीराम नवमीनिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिली.
भोसरी येथील चक्रपाणी वसाहतमधील प्रभू श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत रॅलीला सुरुवात करण्यात आली. आळंदी रोड – दिघी रोड मार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पीएमटी चौक भोसरी येथे समारोप करण्यात आला.
रामनवमीनिमित्त आयोजित दुचाकी रॅलीमध्ये विविध तरुण मंडळे उपस्थित होती. त्यामध्ये माजी नगरसेवक सागर गवळी, माथाडी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष विजय भोसुरे, विदर्भ मित्र मंडळ उद्योजक विनायक भोंगाळे, पांडुरंग गवळी, रवींद्र नांदुरकर तसेच अबालवृद्ध सोबतच चिमुकल्यांचा देखील सहभाग पाहण्यास मिळाला.
सकाळपासूनच अनेक महिलांनी भगवे फेटे परिधान करून प्रभू श्रीरामाचा जयघोष करत, संपूर्ण परिसर राममय झाला होता. प्रभू श्रीरामांच्या जयघोषात शेकडो दुचाकी गाड्यांसह शिस्तबद्धपणे पार पडलेली दुचाकी रॅली संपूर्ण शहराचा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.