पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने, या भागात हवामानशास्त्र विभागाने”यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 17) राज्यात मालेगाव येथे उच्चांकी सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
वातावरणातील खालच्या थरातील द्रोणिका रेषा दक्षिण विदर्भ ते दक्षिण कर्नाटक मराठवाडा उत्तर कर्नाटकातून जात आहे. त्यामुळे हवानामातील बदलामुळे उन्हाचा पारा वाढला असून, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
येत्या 24 तासात कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार असून, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या भागासाठी “यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असून, काही भागात गारपीटही होत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून, पुढील दोन ते तीन दिवस (दि. 20 आणि 21 एप्रिल रोजी ) विदर्भातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यातील कमाल तापमान
मालेगाव आणि बीड – 43.2, जळगाव – 42.8, सोलापूर – 42.6, अकोला 42.1, परभणी 41.7, वर्धा 41.5, पुणे – 39.8 अंश से.