नवी दिल्ली – सोशल मीडियावर कथित द्वेषयुक्त पोस्ट टाकल्याबद्दल भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष असलेले बेंगळुरू दक्षिण मतदार संघातील खासदार तेजस्वी सुर्या यांनी एका पोस्टमध्ये अल्पसंख्याकांना लक्ष्य करून त्यांच्या विषयी शत्रुत्व पसरवले होते, अशी तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी १९ मार्च रोजी एक्सवर आणि युट्युबवर ही पोस्ट केली हेाती.
तक्रारीच्या आधारे, कलम १५३ अ (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि पूर्वग्रहदूषित कृत्ये करणे) अंतर्गत 20 मार्च रोजी हलसूरू गेट पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला.तसेच त्यांच्या विरोधात २९५ अ कलमाद्वारेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर विधान केल्याच्या कारणाने त्यांच्या विरोधात हेही कलम लावण्यात आले आहे.