Chagan Bhujbal on Sanjay Gaikwad – सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांची एकमेकांवर शिवराळ भाषेतील टीका महाराष्ट्रातील जनतेसाठी आता काही नवी राहिली नाही. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांबाबत बोलताना आपल्या शिवराळ शब्दकोशाचे दर्शन वारंवार घडवतच असतात.
याचाच पुढचा अंक महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळाला असून सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्याला कंबरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात यावे अशी सूचना केली आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून शिंदे -फडणवीस – पवार सरकारमध्येच मतभेद असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ मराठा समाजाच्या ओबीसींमधील समावेशाबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत.
अशातच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी टोकाचं वक्तव्य केलं आहे. भुजबळ यांची लाथ घालून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी असं गायकवाड यांनी म्हंटलं आहे.
गायकवाड यांच्या विधानावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय गायकवाड तुम्ही ज्या शिवसेनेच्या शैक्षणिक संस्थेत शिकत आहात. त्या संस्थेतील मी वरिष्ठ प्राध्यापक होतो.’ अशी आठवण भुजबळ यांनी करून दिली आहे.
टीका करताना संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा बरोबर नाही असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
अजितदादांनी साईड लाईन केलं? । Chagan Bhujbal on Sanjay Gaikwad
भुजबळ यांनी यावेळी पक्षाने व अजित पवार यांनी आपल्याला साईड लाईन केलं नसल्याचं म्हंटल. पक्षातील कोणीही आपल्याविरोधात भूमिका मांडली नाही. आपण मंत्री असून अजित पवार यांनी देखील आपल्याला ओबीसी समाजाबाबत बोलण्याचा अधिकार असल्याचं मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री असं करणार नाहीत… | Chagan Bhujbal on Sanjay Gaikwad
“कमरेत लाथ घालून मला बाहेर काढण्याची भाषा वापरली असली तरी मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. राहिला प्रश्न कमरेत लाथ घालण्याचा तर मला असं वाटतं की ते असं करणार नाहीत.”
“कारण त्यांचे स्व. आनंद दिघे आणि त्यांचे सहकारी आमदार मो. दा. जोशी यांच्याबरोबर मी काम करत होतो. त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की, अशी लाथ घालणं किंवा अशाप्रकारची भाषा करणे, हे योग्य नाही” असेही भुजबळ यांनी म्हंटलं.