पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सायंकाळनंतर हजेरी लावत आहे. मात्र, शहरातील कमाल तापमान आणि उकाडा काही कमी होत नाही. बुधवारी (दि. 17) शहरात पुन्हा उच्चांकी ढमढेरे येथे 43.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर खेड, लवळे, मगरपट्टा, वडगावशेरी, बालेवाडी, पुरंदर, राजगुरूनगर, कोरेगाव पार्क आणि हडपसर परिसरातील कमाल तापमान 41 अंशांच्या पुढे गेले आहे.
मागील एक महिन्यांपासून पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून, उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून उन्हाचा चटका नकोसा करत आहे. त्यात तीन दिवसांपासून उन्हाचा पारा 43 अंशांच्या पुढे जाताच वाढत्या उकाड्यावर अवकाळी पावसाने फुंकर मारली. काही वेळ पडत असलेल्या अवकाळी पावसाने क्षणभर दिलासा मिळतो. मात्र, दिवसभर पारा पुन्हा वाढत असल्याने उकाड्याने नकोसे झाले आहे.
दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी शहरात उच्चांकी 43.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. याआधी वडगावशेरी, कोरेगाव पार्क, शिरूर याठिकाणी सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ झाली आहे. पुढील दोन दिवसांत शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून, दिवसभर ऊन आणि सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख भागातील कमाल तापमान
ढमढेरे – 43.1, शिरूर – 42.5, पुरंदर – 41.8, वडगावशेरी – 41.6, चिंचवड – 41.5, मगरपट्टा – 41.3, कोरेगांव पार्क आणि हडपसर – 40.9, बारामती 40.1, शिवाजीनगर 39.8, हवेली – 39.7, पाषाण – 39.4, एनडीए – 39.3, लोणावळा – 35.5.