पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवकाळी पावसाने शहरासह उपनगरांत 40 ते 45 हून अधिक झाडे पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे विजेच्या वायर तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता, तर काही ठिकाणी रस्ते आणि वाहनांवर झाड पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान ही सर्व झाडे तोडून रस्ता मोकळा करण्यात व्यस्त होते.
कोथरूड, बावधन, भुसारी काॅलनी, पाषाण आणि औंध परिसरात सर्वाधिक झाडे पडल्याच्या घटना घडल्या. भुसारी काॅलनीतील पंडित भिमसेन जोशी उद्यान परिसरात एकापाठोपाठ चार ते पाच झाडे पडली.
त्यातील एक मोठे झाड वीजपुरवठा सुरू असलेल्या पोलवर पडल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. बावधन- भूगाव रस्त्यावर चार ते पाच ठिकाणी झाडे पडली. याठिकाणीही रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत पोलवरून केबल ओढण्यात आली आहे. या केबलवरच झाड पडल्यामुळे तेथील पोल वाकले आणि विद्युतपुरवठा खंडित झाला.
यासह बी. टी. कवडे रोड, गोकुळनगर, रास्ता पेठ, ताडीवाला रोडवर राजगुरू चौक, बोपोडी, कसबा पेठ, हडपसर, वडगांवशेरी, चांदणी चौक सीएनजी पंपाजवळ, बाणेर रोड नेक्सा शोरूमजवळ, बावधन व्हेलोसिटी सोसायटी, टिंगरेनगर, विमाननगर, पाषाण,
फुरसुंगी, लोहगाव, खराडी, बुधवार पेठ, पौड रोड महाराजा काॅम्प्लेक्स, भूगाव रोड, वारजे, सुसगाव या परिसरात झाडे पडल्याच्या घटना घडल्या. प्रामुख्याने कोथरूड, बावधन आणि भूगाव परिसरात या घटनांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कोथरूड, एरंडवणा, पाषाण यासह अन्य भागांतून अग्निशामक दलाचे रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते.