दुसऱ्या टप्प्यात गांभीर्याचा अभाव : नागरिकांकडून असहकार्य
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारीअंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक घरोघर फिरून नागरिकांची माहिती घेत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये या सर्वेक्षणाचा मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. परंतु दुसऱ्या टप्प्यात मात्र गांभिर्याचा अभाव दिसून येत आहे. नागरिकांकडून होत नसलेल्या सहकार्यामुळे काही ठिकाणी तर कर्मचारी गुपचूप दरवाजावर स्टीकर चिकटवून सर्वेक्षणाची औपचारिकता करत असल्याचे दिसून आले आहे.
करोनाबाधित रुग्णांची संख्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये झपाट्याने वाढली. त्यामुळे राज्यस्तरावर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पालिकेच्या स्वंयसेवकांचे पथक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेते.
यामध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा अशा व्याधींची माहिती घेतले जाते. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व प्राणवायूची तपासणी केली जाते. प्रत्येक घराचे दोन वेळा सर्वेक्षण केले जाते. पहिल्या टप्प्यात कर्मचारी आणि स्वयंसेवक या सर्वेक्षणात मोठे परिश्रम केल्याचे दिसून आले. कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी पहिल्या टप्प्यात स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता केलेल्या कामामुळे अनेक कोविड संशयित आढळून आले होते. पहिल्या टप्प्यातील त्यांच्या या कार्यामुळे करोना आटोक्यात आणण्यात मोठी मदत मिळाली होती. नागरिकांकडून देखील योग्य प्रकारे सहकार्य मिळत होते.
सद्यस्थितीत शहरामध्ये सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. मात्र यामध्ये अनेक ठिकाणी कर्मचारी प्रत्यक्ष नागरिकांशी बोलून माहिती घेत नाहीत. दरवाजा बंद असला किंवा घरी कोणी नसले तरीही दरवाज्यावर सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे स्टीकर लावण्याची औपचारिकता पूर्ण करत आहेत. सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी कधी दारावर स्टीकर चिकटवून निघून गेले हे देखील त्या घरातील लोकांना माहीत नव्हते. तसेच काही नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने कर्मचाऱ्यांनी केवळ स्टीकर चिकटविण्याची औपचारिकता पूर्ण केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
तुम्ही काय डॉक्टर आहात का?
शहरामध्ये काही ठिकाणी नागरिक ही या सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा अपमान करत असल्याचे दिसून आले. घरी माहिती घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिक चांगली वागणूक देत नाहीत. काहींनी तर माहिती देण्याऐवजी “तुम्ही काय डॉक्टर आहात का? आले मोठे तपासणी करायला’ असे म्हणून तोंडावर दरवाजे बंद केल्याचे किंवा गेटच न उघडल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषः म्हणजे असे करणारे सुशिक्षित आणि उच्चभ्रू परिसरातील नागरिक होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही अनेक ठिकाणाहून केवळ स्टीकर चिकटवून काढता पाय घ्यावा लागला.