Muslims Reservation – मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला देखील शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान समाजवादी पक्षाच्या वतीने विधानभवनाच्या पायऱ्यांवर या संदर्भात आंदोलन करत ही मागणी करण्यात आली. या आंदोलनात आमदार अबू आझमी आणि शेख रईस हे देखील उपस्थित होते.
या अधिवेशनाचे तसेच मराठा आरक्षण विधेयकाचे आम्ही स्वागत करत असल्याचे अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजाला देखील आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम समाजावर अन्याय होता कामा नये, मुस्लिम समाजातील गरीब नागरिकांना देखील आरक्षणाचा लाभ मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
मराठा समाजाने आंदोलन केल्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मात्र, मुस्लिम आरक्षणावर कोणीही बोलत नसल्याची खंत आमदार अबू आझमी यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाजाची मते सर्वांना हवी आहेत.
मात्र, मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर बोलण्यास कोणी तयार नसल्याचे ते म्हणाले. जर मुस्लिम समाजाने मराठा समाजासारखे आंदोलन केले, तर त्यांना गोळ्या मारल्या जातील, असा आरोप देखील आझमी यांनी केला आहे.