वाघोली (प्रतिनिधी): कोरोना परिस्थितीमध्ये घरातच नमाज पठण करून रमजान ईद साजरी करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन व वाघोली जामा मशिदीच्या मौलानांनी केल्यानंतर वाघोली परिसरातील मुस्लीम बांधवांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातच नमाज पठण करून ईद साजरी केली.
दरवर्षी शेकडो मुस्लीम बांधव ईदच्या दिवशी वाघोलीतील मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी येत असतात. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन मुस्लीम बांधवांनी घरातच शांततेत ईद साजरी केली. घरा बाहेर न पडता सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुस्लीम बांधवांना सर्वांनीच ईदच्या शुभेच्छा दिल्या. वाघोली परिसरातील काही गरजू मुस्लीम बांधवांना शिरखुर्मा बनविण्याचे साहित्य वाटप करण्यात आले असल्याचे अबिद शेख, सनी अन्सारी यांनी सांगितले.