व्यापाऱ्यावर खुनी हल्ला

फलटण येथील धक्कादायक घटना मुलासह दोघे जखमी
दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी दिले पोलिसांना निवेदन
फलटण  – लूटमार करण्याच्या हेतूने येथील एका व्यापाऱ्याच्या आणि मदतीला आलेल्या त्याच्या मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दोघांना चाकूने भोसकून गंभीर जखमी करण्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी शहरातील व्यापाऱ्यांनी काही काळ दुकाने बंद ठेवून पोलिसांना निवेदन दिले.

प्रीतम गांधी (रा. सिटी बज़ारसमोर, लक्ष्मीनगर, फलटण) यांचे अरविंद क्‍लॉथ हे कपड्यांचे दुकान असून रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद करून ते जवळच असणाऱ्या घरी जाताना घराजवळील पार्किंगमध्ये दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांची बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. प्रीतम गांधी यांचा मुलगा पार्श्‍व (वय 17) याने हा प्रकार पाहताच तो पळत आला. त्याने तिघांना आरड़ाओरड करीत विरोध केला असता तिघांपैकी एकाने आपल्या जवळील चाकू प्रीतम गांधी यांच्या पाठीत खुपसला. तिघांनी दोघांना मारहाण केली आणि बॅग हिसकावून दुचाकीवरून पळून जाऊ लागले. यावेळी पार्श्‍वने

एकाला गाडीवरुन खाली पाडून पकडून ठेवले. आरड़ाओरड ऐकून बाजूचे नागरिक आले. त्यांनी पार्श्‍वने पकडलेल्या संशयिताला पकडून ठेवले. इतर दोघे मोटरसायकलवरुन पळून गेले. पकडलेल्या संशयिताचे नाव अनिकेत नरेंद्र कदम(वय 19, रा. सगुनामाता नगर, मलटन, फलटण) असे आहे. गांधी पिता- पुत्रांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या बॅगमध्ये किती पैसे होते, हे समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती समजताच शहरातील संतप्त व्यापाऱ्यांनी आज सकाळी दुकाने बंद ठेवून फलटण शहर पोलिस ठाण्यात येऊन पोलिस निरीक्षक प्रताप पोमन यांना निवेदन दिले. निवेदनाद्वारे आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना फरारी संशयितांना लवकर पकडून त्यांच्यावर कड़क करवाई करण्याची मागणी केली.

या घटनेची माहिती कळताच नगरपालिकेतिल विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिंगबर आगवणे यांनीही पोलिस ठाण्यात येऊन खुनी हल्याचा निषेध केला. व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची आणि शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्याची त्यांनी मागणी केली. हलेखोरावर कड़क कारवाई करण्याचे आश्‍वासन पोमन यांनी यावेळी दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. या घटनेची फ़िर्याद पार्श्‍व गांधी यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.